अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडेच असल्याचं अजित पवारांचं स्पष्टीकरण
अहमदनगरची जागा काँग्रेससाठी सोडल्याचं शरद पवार यांनी कधीच म्हटलं नाही असं अजित पवार यांनी सांगितलं. पुण्यातील वारजे येथील कल्चर सेंटरच्या उदघाटन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं.
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. अहमदनगरच्या जागेवर राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे पाटील लढण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेससाठी सोडल्याची चर्चा सुरु होती. मात्र अहमदनगरची जागा राष्ट्रवादीच लढणार तसेच काँग्रेससाठी अहमदनगरची जागा सोडली नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
अहमदनगरची जागा काँग्रेससाठी सोडल्याचं शरद पवार यांनी कधीच म्हटलं नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. पुण्यातील वारजे येथील कल्चर सेंटरच्या उदघाटन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दोन जागांची मागणी केली होती. आम्ही एक जागा द्यायला तयार आहोत. बहुजन वंचित आघाडीसोबत चर्चा सुरु आहे, मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या मनात काय सुरु आहे ते समजत नाही. प्रकाश आंबेडकर महाआघाडीसोबत यायला तयार असल्यास आम्ही त्यांना चार जागा द्यायला तयार आहोत, असं अजित पवार म्हणाले.
तसेच अहमदनगरच्या जागेचा प्रश्न प्रतिष्ठेचा करुन फायदा नाही. हा विषय चर्चेतून सोडवावा, असं आवाहन राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं आहे.