बीडमध्ये राष्ट्रवादीला धक्का, केजच्या उमेदवार नमिता मुंदडा भाजपमध्ये
नमिता मुंदडा यांनी काह दिवसांपूर्वी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, कोणत्यांनी पक्षाचं चिन्ह अथवा कोणत्याही नेत्याचं नाव त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं नव्हतं. त्यामुळे नमिता मुंदडा राष्ट्रवादीला रामराम ठोकणार अशी चर्चा आधीच रंगू लागली होती.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवसांपूर्वी स्वत: शरद पवार यांनी बीडमधील पाच उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये केज मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झालेली असताना नमिता मुंदडा यांनी भाजपवासी होण्याचा निर्णय घेतला आहे.
नमिता मुंदडा आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे. महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत परळीत येथे नमिता मुंदडा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच दिले होते.
नमिता मुंदडा यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे, त्यासाठी जनतेचा आशीर्वाद मागत आहे, अशी पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. मात्र या पोस्टमध्ये कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, कोणत्याही पक्षाचं चिन्ह अथवा कोणत्याही नेत्याचं नाव त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं नव्हतं. त्यामुळे नमिता मुंदडा राष्ट्रवादीला रामराम ठोकणार अशी चर्चा आधीच रंगू लागली होती.
...म्हणून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी?
एका पक्षात राहून देखील राष्ट्रवादीत मुंदडा गट कायम आपलं वेगळं अस्तित्व जपून होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा मुंदडांसोबत कायम दुरावा होता. एका विधानसभा मतदारसंघात असतानाही बजरंग सोनवणे यांच्या राष्ट्रवादीच्या बॅनर्सवर कधी मुंदडांचा फोटो पाहायला मिळाला नाही. तर धनंजय मुंडे हे सुद्धा मुंदडांपासून दोन हात दूर राहतानाचं चित्र यापूर्वी अनेक कार्यक्रमातून पाहायला मिळालं.
केज विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेतृत्व करणाऱ्या मुंदडांना पक्षाच्या कामात मात्र कायम बाजूला सारलं जायचं. म्हणूनच निवडणुका आल्या की राष्ट्रवादी पक्षाचे बडे नेते हे धनंजय मुंडे आणि अक्षय मुंदडा यांना तडजोडीसाठी एकत्र बसवत असत. तडजोडी करुन बडे नेते जिल्ह्याबाहेर गेले ते पुन्हा जैसे थे परास्थिती पाहायला मिळायची.
2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नमिता मुंदडा यांनी पहिल्यांदा विधानसभेचे निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजपच्या संगीता ठोंबरे यांनी त्यांचा तब्बल 40 हजार मतांनी पराभव केला. संगीता ठोंबरे यांच्याबाबत केज विधानसभा मतदारसंघातून अनेक तक्रारी गेल्या पाच वर्षाच्या काळात पक्ष नेतृत्वापर्यंत गेल्या. म्हणूनच संगीता ठोंबरे यांना या मतदारसंघातून पुन्हा भाजप उमेदवारी देणार का याविषयी शंका आहे.
राष्ट्रवादीचा उमेदवारी फोडण्याची दुसरी वेळ
राष्ट्रवादीचा उमेदवार फोडण्याची भाजपची ही दुसरी वेळ आहे. याआधी विधानपरिषदेच्या उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सुरेश धस यांच्या विरोधात लढलेल्या रमेश कराड यांना ऐनवेळी भाजपने आपल्या बाजूने केलं होतं. या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपच्या सुरेश धस यांच्या विरोधात रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र कराड यांनी अचानक माघार घेतल्याने राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांन पुरस्कृत केलं होतं. त्यावेळी सुरेश धस आणि अशोक जगदाळे यांच्या अटीतटीच्या लढतीत धस यांनी बाजी मारली होती. त्यानंतर रमेश कराड यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
संबंधित बातम्या