(Source: Poll of Polls)
Monika Rajale : स्वतःला शाळेच्या खोलीत बंद केलेल्या मोनिका राजळे यांची सुटका, समोर आलं कारण
Monika Rajale Pathardi : पाथर्डीच्या आमदार आणि भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे या शिससाटवाडीतील एका शाळेत बंद होत्या. पोलिसांनी त्यांची सुटका केली आहे.
अहिल्यानगर : बाहेर हुल्लडबाजी सुरू असल्याने स्वतःला एका शाळेच्या खोलीत बंद करून घेतलेल्या भाजपच्या आमदार आणि पाथर्डीच्या उमेदवार मोनिका राजळे यांना पोलिसांनी सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. बूथ कॅप्चरिंगची माहिती मिळाल्यानंतर आपण शिरसाठवाडी या ठिकाणी गेलो असता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जमावाने हुल्लडबाजी सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतरच मोनिका राजळे यांनी स्वतःला शाळेच्या खोलीत बंद करून घेतल्याची माहिती आहे.
सध्या पाथर्डी शहरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. शिरसाठवाडी येथील हुल्लडबाज जमावापासून वाचण्यासाठी मोनिका राजळे यांनी शाळेच्या वर्गखोलीत स्वतःला बंद करून घेतले होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना शाळेच्या खोलीतून बाहेर काढण्यात आले.
हुल्लडबाजांमुळे स्वतःला कोंडून घेतलं
शिरसाठवाडी येथे बूथ कॅप्चरिंग होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजप आमदार मोनिका राजळे या तेथे भेट देण्यासाठी गेल्या. त्यानंतर त्यांच्यावर जमाव चालून आल्याचा दावा त्यांनी केला. हा मोठा जमाव असल्याने मोनिका राजळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं.
त्यानंतरही संबंधित खोलीच्या बाहेर मोठा जमाव होता. तसेच त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त कमी असल्याने मोनिका राजळे या बाहेर येण्यास तयार नव्हत्या. त्यांनी दूरध्वनीवरून पोलिसांशी संपर्क करत मदत मागवली. बाहेरील जमाव हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असल्याचा त्यांनी दावा केला.
काही वेळाने पोलिस आल्यानंतर त्यांनी मोनिका राजळे यांची सुटका केली आणि त्यांना पोलिस सुरक्षेमधून त्या ठिकाणाहून नेण्यात आले.
दगडफेक केल्याचा आरोप
या जमावाने आपल्यावर दगडफेक केल्याचा आरोप मोनिका राजळे यांनी केला आहे. संबंधित मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न जमावाने केल्याचा आरोपही राजळे यांनी केला आहे. याबाबत माहिती मिळताच मोनिका राजळे या मतदान केंद्रावर पोहचल्या होत्या. मात्र मतदान केंद्राबाहेरील जमावाने त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत दगडफेक केल्याचा आरोप राजळे यांनी केला.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेत दोन तास मतदानकेंद्रात बसून असलेल्या राजळे यांची सुटका केली. तर या घटनेने संतप्त झालेल्या हजारो राजळे समर्थकांनी रात्री शहरातील माणिकदौण्डी चौकात रास्तारोको आंदोलन सुरु केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र मोनिका राजळे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. या संपूर्ण घटनेनंतर पाथर्डी शहरात तणावपूर्ण शांतता आहे.