'ते' सॅटेलाईट चीन किंवा पाकिस्तानचं, चंद्रकांत पाटलांनी वर्तवली शक्यता
पंतप्रधान नरेंद्र आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत गुप्तता पाळलेली असताना महसूलमंत्र्यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.
बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा करत भारतानं अंतराळात सॅटेलाईट पाडल्याचं जाहीर केलं. मात्र हे सॅटेलाईट कोणत्या देशाचं होतं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याबाबत प्रचंड गोपनीयता राखण्यात आली आहे. मात्र हे सॅटेलाईट पाकिस्तान किंवा चीनचं असण्याची शक्यता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली आहे. त्यामुळे देशाच्या गोपनीय कारवाया भाजप नेत्यांनाच कशा समजतात असा सवाल उपस्थित होवू लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत गुप्तता पाळलेली असताना महसूलमंत्र्यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.
अंतराळात भारताचा सर्जिकल स्ट्राईक, 3 मिनिटात सॅटेलाईटचा वेध : पंतप्रधान मोदी
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी बारामतीत आले होते. यावेळी आमदार राहुल कुल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी भारतानं सॅटेलाईट पाडल्याच्या नरेंद्र मोदींनी केलेल्या घोषणेबद्दल माहिती दिली. हे सॅटेलाईट चीन किंवा पाकिस्तानचं असण्याची शक्यता वर्तवत त्यांनी गोपनीय विषयावरच आपलं मत मांडलं.
बारामतीत दादागिरी चालणार नाही
बारामतीत काही लोकांची दादागिरी चालत असल्याचं कार्यकर्ते आपल्याला सांगतात. या देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे कोणाची दादागिरी चालणार नाही असं सांगत चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना नाव न घेता इशारा दिला.
विविध समाजाच्या लोकांपर्यंत पोहोचा
सध्याच्या निवडणुकीच्या काळात भाजप कार्यकर्त्यांनी सरकारनं कोणत्या समाजासाठी काय केलं हेही लोकांपर्यंत पोहचवलं पाहिजे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. विशेष म्हणजे जातीवर मतं मागण्याची पद्धत राहिलेली नाही. मात्र कार्यकर्त्यांनी त्या-त्या समाजापर्यंत पोहोचण्याचा सल्ला चंद्रकांत पाटलांनी दिला. त्यामुळे निवडणुकांमधील जातीय राजकारण अद्याप सुरुच असल्याचं दिसून आलं.