Ram Satpute: 'मारकडवाडी गाव भाजपाचं आहे अन् राहील', भाजपचे पराभूत उमेदवाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दिवा विझायच्या आधी फडफड करत..'
Ram Satpute: आज या गावात शरद पवार या गावात दाखल झाले आहेत. त्यांच्या जाण्याने सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका देखील केली, तर या गावात जास्त मते मिळालेले भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी पोस्ट करत हल्लाबोल केला आहे.
माळशिरस: राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यापासून माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी हे गाव राज्यात नाही तर देशभरात चर्चेत आलं आहे. ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केलेल्या मारकडवाडी गावाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. बॅलेट पेपरवर मतदान करण्यात यावे यासाठी या गावाने 29 नोव्हेंबर पासून आंदोलनाला सुरुवात केली होती. मारकडवाडी येथे विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानामध्ये शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांना गावात कमी मते मिळाल्याचे समोर आले. यावर जानकर गटाने आक्षेप घेतला होता. याचवेळी विरोधी भाजपच्या समर्थक ग्रामस्थांनी या बॅलेट वरील मतदानावर बहिष्कार टाकल्याने याबाबत गावात उघड दोन गट पडले, त्यानंतर मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर व्हावी अशा मागणी केली जाऊ लागली. गावात मोठ्या घडामोडी घडल्या, आज या गावात शरद पवार या गावात दाखल झाले आहेत. त्यांच्या जाण्याने सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका देखील केली, तर या गावात जास्त मते मिळालेले भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी पोस्ट करत हल्लाबोल केला आहे.
आपल्या पोस्टमध्ये भाजप नेते राम सातपुते यांनी आपल्या सोशल मिडिया एक्स (पुर्वीचे ट्विटर) वरती पोस्ट लिहून, 'रणजीत मोहिते पाटलांचे आणि उत्तम जानकरचे पाळीव गुंड मारकडवाडीतील ग्रामस्थांना अशा भाषेत धमक्या देत आहेत . मारकडवाडी गाव भाजपा च आहे आणि राहील. दिवा विझायच्या आधी फडफड करत असतो', अशा शब्दात टोला लगावला आहे.
रणजीत मोहिते पाटलांचे आणि उत्तम जानकर चे पाळीव गुंड मारकडवाडीतील ग्रामस्थांना अशा भाषेत धमक्या देत आहेत .
— Ram Satpute (@RamVSatpute) December 8, 2024
मारकडवाडी गाव भाजपा च आहे आणि राहील.
दिवा विझायच्या आधी फडफड करत असतो . @Dev_Fadnavis @cbawankule @AmitShah #Markadwadi pic.twitter.com/dacNKjhJRC
नेमकं काय आहे प्रकरण?
मारकडवाडी गावाने ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलनाला सुरुवात केली. आज शरद पवार हे सकाळी हेलिकॉप्टरने या गावात दाखल झाले आहेत. बॅलेटवर मतदान करण्यात यावे यासाठी या गावाने 29 नोव्हेंबर पासून आंदोलनाला सुरुवात केली होती. या गावाचा आवाज एबीपी माझाने समोर आणला आणि तीन डिसेंबर रोजी मतदान घेण्याचा निर्णय करण्यात आला होता.
मात्र प्रशासनाने 2 डिसेंबर ते पाच डिसेंबर या काळात या गावांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करत बॅलेटवर मतदान घेण्यास विरोध केला. अखेर 3 डिसेंबर रोजी होणारे मतदान ऐनवेळी रद्द करावे लागले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या गावात येऊन ग्रामस्थांची भूमिका जाणून घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बॅलेटवर मतदान करण्याबाबतच्या याचिका फेटाळून लावल्यानंतर आता पुन्हा शरद पवार याबाबत न्यायालयात जाणार असल्याची चर्चा आहे. पवार नेमकी काय भूमिका घेत आहेत हे समोर येणार असून राहुल गांधी देखील या गावात येणार असल्याची चर्चा आहे.
मारकडवाडी येथे विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानामध्ये शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांना गावात कमी मते असल्याचे समोर आल्याने आक्षेप घेतला होता. याचवेळी विरोधी भाजपच्या समर्थक ग्रामस्थांनी या बॅलेटवरील मतदानावर बहिष्कार टाकल्याने याबाबत गावात उघड दोन गट पडलेले आहेत. हे आंदोलन शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांच्या समर्थकांनी सुरू केले असून याला संपूर्ण मारकडवाडीचा पाठिंबा नाही. राज्य निवडणूक आयोगाने ही याबाबत खुलासा करीत मारकडवाडी येथील तीनही बुथवर झालेले मतदान आणि मतमोजणी समोर आलेले मतदान हे सारखेच असून यात विनाकारण मशीनबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले होते. याशिवाय संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत जानकर गटाचे प्रतिनिधी पहिल्यापासून शेवटपर्यंत उपस्थित असूनही त्यांनी याबाबत कोणतीही तक्रार अथवा आक्षेप निकाल लागेपर्यंत घेतलेला नव्हता .