"Game Not Over Wait", इंडिया आघाडीच्या ट्वीटनं टेन्शन वाढलं, विरोधकांचं पुढचं पाऊल काय? BJP ची धाकधूक वाढली
India Alliance Meeting: इंडिया आघाडीच्या ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट करण्यात आलं आहे. त्या ट्वीटमध्ये "गेम नॉट ओव्ह, वेट", असं ट्वीटही करण्यात आलं आहे.
Mallikarjun Kharge Reaction: नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांनंतर (Lok Sabha Election 2024) दिल्लीतील (Delhi) राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. परवा निकाल लागल्यानंतर काल (5 जून) दिल्लीत एनडीए (NDA) आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीची (India Alliance) महत्त्वाची बैठक पार पडली. सर्व देशाच्या नजरा दिल्लीतील घडामोडींवर खिळल्या होत्या. एकीकडे एनडीएकडून सत्ता स्थापन करण्यासाठी वेगानं हालचाली सुरू आहे. कालच पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन सत्तास्थापन करण्याचा दावा केला. अशातच लवकरच नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. तर दुसरीकडे इंडिया आघाडीकडून देशातल्या पक्षांना खुलं निमंत्रण देण्यात आलं आहे. संविधानावर विश्वास असणाऱ्या पक्षांनी इंडिया आघाडीत सहभागी व्हावं, असं अवाहन काँग्रेस अध्यक्षांनी केलं आहे. तसेच, इंडिया आघाडीच्या ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट करण्यात आलं आहे. त्या ट्वीटमध्ये "गेम नॉट ओव्हर, वेट", असं म्हटलं आहे. पण, हे इंडिया आघाडीचं अधिकृत ट्विटर हँडल आहे की, नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
इंडिया आघाडी नावाच्या ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट करण्यात आलं आहे. "Game Not Over Wait" एवढंच ट्वीटमध्ये लिहिलं आहे. या ट्वीटमुळे देशभरात चर्चा सुरू आहेत. आता सत्तासंघर्ष पाहायला मिळणार का? भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इंडिया आघाडी नवा डाव टाकणार का? असे अनेक प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत.
इंडिया आघाडीची बैठक संपल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "इंडिया अलायन्स योग्य वेळेची वाट पाहणार आहे. आम्ही एकजुटीनं निवडणूक लढवली आणि पूर्ण ताकदीनं लढलो. मोदींच्या जनमताला नकार देण्याचा आमचा प्रयत्न असेल. हा मोदींचा नैतिक आणि राजकीय पराभव आहे. आम्ही मोदींविरोधात लढत राहू. हा जनादेश भाजपच्या धोरणांच्या विरोधात आहे."
Game Not Over
— I-N-D-I-A (@_INDIAAlliance) June 5, 2024
Wait
भाजपला जनतेनं चोख प्रत्युत्तर दिलंय : मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, "आमच्या बैठकीत युती पक्षाच्या नेत्यांनी सद्य राजकीय परिस्थिती आणि अनेक सूचनांवर चर्चा केली. इंडिया आघाडीचे घटक पक्ष भारतातील जनतेला मिळालेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. जनतेच्या जनादेशानं भाजप, द्वेष आणि भ्रष्टाचाराच्या राजकारणाला चोख प्रत्युत्तर दिलं आहे."
हा जनादेश लोकशाही वाचवण्यासाठी आहे : मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पुढे बोलताना म्हणाले की, "हा जनादेश भारताच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आणि महागाई, बेरोजगारी, भांडवलशाहीच्या विरोधात आणि लोकशाही वाचवण्यासाठी आहे. इंडिया आघाडी मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या फॅसिस्ट राजवटीविरुद्ध लढा सुरू ठेवेल."
भाजपनं यापुढे राज्य करू नये, अशी जनतेची इच्छा आहे. हे लक्षात घेऊन जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य वेळी योग्य ती पावलं उचलू. हा आमचा निर्णय आहे आणि आम्ही या मुद्यांवर पूर्णपणे सहमत आहोत. आम्ही जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करू, असंही मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आहेत.