शिवडीचा तह तुर्तास अयशस्वी, मातोश्रीवरच्या बैठकीत अजय चौधरी-सुधीर साळवी दोघेही इरेला पेटले, माघारीचे प्रस्ताव धुडकावले
Maharashtra Vidhansabha Election 2024: उद्धव ठाकरेंनी अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांना मातोश्रीवर बोलवून घेतलं होतं.
Maharashtra Vidhansabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. काल भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आज पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर शिवडी विधानसभा (Shivadi Assembly Constituency) मतदारसंघावरुन मोठा पेच उभा राहिला आहे. शिवडी मतदारसंघासाठी विद्यामान आमदार अजय चौधरी (Ajay Choudhari) आणि लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी (Sudhir Salvi) यांनी शड्डू ठोकला आहे. आज उद्धव ठाकरेंनी उमेदवार निश्चितीसाठी अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांना मातोश्रीवर बोलावून घेतलं होतं. यावेळी दोघेही माघार घेण्याच्या मनस्थितीत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवडी विधानसभेसाठी वेट ॲन्ड वॅाचची भूमिका घेतली आहे. शिवडी विधानसभेचा प्रश्न सध्या तरी अयशस्वी राहिला असला तरी उमेदवारी निश्चिती संदर्भातील निर्णय आज रात्रीपर्यंत घेतला जाणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं कोणाला उमेदवारी देणार?, याकडे शिवडीकरांसह मुंबईचं लक्ष लागलं आहे.
2014, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजय चौधरींचा विजय-
शिवडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी यांनी मोठा विजय मिळवलेला. अजय चौधरी यांनी तब्बल 42 हजार मतांनी विजय मिळवत पुन्हा एकदा शिवडी मतदारसंघावर भगवा फडकवलेला. अजय चौधरी यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार उदय फणसेकर आणि मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा दणदणीत पराभव केला. अजय चौधरींच्या तुलनते या दोन्ही उमेदवारांचा मतदारसंघात तितका जनसंपर्क नव्हता. अजय चौधरी यांचा विधानसभा निवडणूक 2014 मध्येही विजय झाला होता.
मनसेकडून बाळा नांदगावकर रिंगणात-
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभेच्या 6 उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवडी मतदारसंघात बाळा नांदगावकर विरुद्ध अजय चौधरी यांच्यात लढत होणार की बाळा नांदगावकरविरुद्ध सुधीर साळवी, हे येणाऱ्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
संबंधित बातमी:
राज्यातील 288 मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवारांची यादी; विधानसभेला मनसे अन् वंचितने घेतली आघाडी