Maharashtra Elections 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस, मुंबईत नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत रोड शोला जोर
Maharashtra Elections 2024: आज संध्याकाळी 5 वाजता प्रचार थांबेल, त्यामुळे उमेदवार आज आपली पूर्ण ताकद लावताना दिसत आहेत.
मुंबई: आज राज्यभरातील प्रचाराच्या तोफा सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावतील. त्याआधी आज दिवसभरात सांगता सभा, आणि शेवटचा प्रचार होणार आहे. आज दिवसभरात नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत आज अनेक ठिकाणी रोड शो होणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी 5 वाजता प्रचार थांबेल, त्यामुळे उमेदवार आज आपली पूर्ण ताकद लावताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा राज ठाकरे यांसारखे प्रमुख नेते, रोड शोच्या माध्यमातून आपली ताकद दाखवत आहेत.
नेत्यांचे भव्य रोड शो
नवाब मलिक आणि त्यांची मुलगी सना मलिक अनुशक्ती नगर आणि शिवाजी नगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघात भव्य रोड शोद्वारे शक्तीप्रदर्शन करणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवही मुंबईतील अर्धा डझन विधानसभा मतदारसंघांमध्ये रोड शोद्वारे प्रचार करत आहेत. कळिना विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार अमरजित सिंग यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी बाईक रॅली काढली आहे.
नेत्यांसोबत अभिनेता मैदानात
सायन कोळीवाडा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार तमिळ सेल्वन यांनी प्रचारासाठी आपली ताकद झोकून दिली आहे. दोन वेळा आमदार राहिलेले तमिळ सेल्वन विजयाची हॅटट्रिक साधण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार शरथ कुमार उपस्थित होते. यामुळे तमिळ सेल्वन यांच्या रोड शोला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.
तमिळ सेल्वनची बहादुरी प्रचाराचा भाग
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात CST रेल्वे स्थानकावर जखमी झालेल्या 40 जणांना रुग्णालयात पोहोचवण्याचे धाडस तमिळ सेल्वन यांनी दाखवले होते. या कार्यामुळे त्यांचे पोस्टर्स व्हायरल होत आहेत. तमिळ सेल्वन म्हणतात, "माझ्यावर भाषा-प्रांतीय समुदायाचे प्रेम आहे, त्यामुळे यंदाही सायन कोळीवाड्यातून भाजपला विजय मिळणार आहे."
भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव ‘निरहुआ’ यांचा प्रचारात सहभाग
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता दिनेश लाल यादव ‘निरहुआ’ यांचा मुंबईत जोरदार प्रचार सुरू आहे. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी निरहुआ कांदिवलीतून भाजपा उमेदवार अतुल भातखळकर यांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरले. त्यांनी ऑटो रिक्षात बसून प्रचार केला आणि उत्तर भारतीय समाजात मतदारांशी संवाद साधला. मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी चहा चर्चा आणि बाटी-चोखा भोजनाद्वारे प्रचाराचा वेगळा मार्ग अवलंबण्यात आला आहे.
आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकूण प्रचार सभा
4 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या दोन आठवड्यात उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्रात 44 सभा पार पडणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या वरळीतील प्रचार फेऱ्यांसोबत महाराष्ट्रभर 22 सभा होत आल्या आहेत. राज्यभरात आज विधानसभा संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपेल. 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील 288 जागांसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील.