Dhananjay Mahadik : खासदार महाडिकांनी एकाचवेळी शिराळा आणि कोल्हापूर उत्तरसाठी डाव टाकला, पण हाती निराशा आली; नाना कदमही शिंदे गटाच्या वाटेवर!
कृष्णराज महाडिक यांना शिंदे गटात प्रवेश करून देत उमेदवारी घेतली जाणार का? याकडे लक्ष होते. मात्र, गेल्या 48 तासांत घडलेल्या वेगवान घडामोडीत पुन्हा एकदा राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित झाली.
![Dhananjay Mahadik : खासदार महाडिकांनी एकाचवेळी शिराळा आणि कोल्हापूर उत्तरसाठी डाव टाकला, पण हाती निराशा आली; नाना कदमही शिंदे गटाच्या वाटेवर! Maharashtra Vidhan Sabha Election 2024 MP dhananjay Mahadik tried simultaneously for Shirala and Kolhapur North but missed the chance Dhananjay Mahadik : खासदार महाडिकांनी एकाचवेळी शिराळा आणि कोल्हापूर उत्तरसाठी डाव टाकला, पण हाती निराशा आली; नाना कदमही शिंदे गटाच्या वाटेवर!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/27/2b90e7bfcd4c85bf4c7dc40281e758aa1730007931631736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावरून चांगलीच चर्चा रंगली होती. या मतदारसंघांमधून कोणाला उमेदवारी मिळणारी याची चर्चा होती. अर्थात महायुती आणि महाविकास आघाडीकडून सुद्धा वेट अँड वॉची भूमिका घेण्यात आल्याने मतदारसंघांमध्ये उमेदवार असणार तरी कोण याचीच चर्चा सर्वाधिक होती. मात्र, या चर्चेला पूर्णविराम अखेर शनिवारी संध्याकाळी मिळाला. शनिवारी काँग्रेसकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देण्यात आली आहे.
पुन्हा एकदा राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित
दुसरीकडे महायुतीमध्ये सुद्धा कोल्हापूर उत्तरमध्ये घमासान सुरू होतं. या ठिकाणी शिंदे गटाचे माजी आमदार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर गेल्या अडीच वर्षांपासून माझी उमेदवारी फायनल असल्याचे सांगितले होते. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 28 तारीख सुद्धा निश्चित केली होती. मात्र, शिंदे गटाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये त्यांच नाव न आल्याने राजकीय भूवया उंचावल्या. त्यामुळे राजेश क्षीरसागर यांचा पत्ता कट होणार का? अशीही चर्चा रंगली. भाजप या मतदारसंघावर आक्रमकपणे दावा करणार का अशीही चर्चा रंगली होती.
2022 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने या मतदारसंघांमध्ये 80 हजारांवर मते घेतली होती. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपकडून सत्यजित कदम यांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू होते. खासदार महाडिक आणि राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये कोल्हापूर उत्तर मतदारसंघावरून चांगलाच कलगीतुरा रंगला होता. त्यामुळे सत्यजित कदम यांचे प्रयत्न सुरू असतानाच ते बंडखोरी करणार का? अशी ही चर्चा रंगली होती. दुसऱ्या बाजूने खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून मुलगा कृष्णराज महाडिक यांच्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू होते. मतदारसंघ न मिळाल्यास कृष्णराज महाडिक यांना शिंदे गटात प्रवेश करून देत उमेदवारी घेतली जाणार का? याकडेही लक्ष होते. मात्र, गेल्या 48 तासांमध्ये घडलेल्या वेगवान घडामोडींमध्ये पुन्हा एकदा राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
महाडिक पिता पुत्रांकडून कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारीवरून खुलासा
गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत खासदार महाडिक यांनी काल भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, सत्यजित कदम यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. त्याचवेळी कृष्णात महाडिक सुद्धा संधी मिळाल्यास चांगलं काम करू शकतात, असंही धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर काल संध्याकाळी कृष्णराज महाडिक यांच्याकडून सुद्धा खुलासा करण्यात आला. आणि कोल्हापूरची उत्तरची जागा शिंदे गटाकडे असल्याचे स्पष्ट केले. मध्यरात्री पुन्हा एकदा राजेश क्षीरसागर पुन्हा एकदा मुंबईत पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत सत्यजित कदम सुद्धा होते. यावेळी सत्यजित कदम बंडखोरी करणार नाहीत याबाबतही त्यांच्याकडून आश्वासन घेण्यात आले. त्यामुळे राजेश क्षीरसागर यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
सत्यजित कदम शिंदे गटाच्या वाटेवर!
दुसरीकडे, कोल्हापुरातील भाजपमधील अंतर्गत वाद सुद्धा चव्हाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यानंतर भाजप नेते सत्यजित कदम शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राजेश क्षीरसागर आणि नाना कदम यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी समेट घडवत मोठा अडथळा दूर केला आहे. सत्यजित कदम यांनी राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
शिराळ्यातून सत्यजित देशमुखांना उमेदवारी
दुसरीकडे शिराळा मतदारसंघामधून सुद्धा सम्राट महाडिक यांच्या उमेदवारीसाठी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून भेटीगाठी सुरू होत्या. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत आमदार सदाभाऊ खोत सुद्धा होते. मात्र शिराळा मतदारसंघांमध्येही भाजपकडून सत्यजित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिराळामध्ये सुद्धा महाडिक यांच्या प्रयत्नांना यश आलं नसल्याचे दिसून येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)