Maharashtra Loksabha Election : विदर्भातील पाच जागांसाठी तब्बल 85 उमेदवार रिंगणात; नागपूर मतदारसंघात सर्वाधिक अपक्षांचा भरणा
पहिल्या टप्प्यात एकूण 5 लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूरचा समावेश आहे. 5 मतदारसंघात 85 उमेदवार रिंगणात आहेत.
Maharashtra Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रातील पाच जागांसाठी उमेदवार निश्चित झाले असून लढतींचे चित्र स्पष्ट झालं आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 26 उमेदवार रिंगणात आहेत. त्या खालोखाल चंद्रपूरमध्ये 15 उमेदवार रिंगणात आहेत. विदर्भातील बहुतांश जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीने दिलेल्या उमेदवारांमुळे निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूरचा समावेश आहे. एकूण 5 मतदारसंघात 85 उमेदवार रिंगणात आहेत.
नागपूरमध्ये सर्वाधिक उमेदवार रिंगणात
नागपूरमध्ये थेट लढत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यामध्ये होणार आहे. नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीकरून पाठिंबा देण्यात आला आहे. 11 अपक्ष सुद्धा रिंगणात आहेत. त्यामुळे हे अपक्ष आता कोणासाठी डोकेदुखी ठरणार याचे उत्तर आता चार जून रोजी मिळणार आहे. त्या खालोखाल चंद्रपूरची लढत सुद्धा लक्षवेधी होण्याची चिन्हे असून15 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. भाजपकडून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यांच्या विरोधात प्रतिभा धानोरकर रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदारसंघाकडे सुद्धा राज्याचे लक्ष लागून राहिलं आहे. ही एकमेव जागा काँग्रेसने 2019 मध्ये जिंकली होती. त्यामुळे या जागेवर काँग्रेसला पुन्हा एकदा विजयाची आशा आहे.
गडचिरोलीत सर्व पुरुष उमेदवार
गडचिरोलीमध्ये सुद्धा भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत होणार आहे. भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे किरसन नामदेव रिंगणामध्ये आहेत. एकूण 10 उमेदवार रिंगणात असून सर्वच्या सर्व पुरुष उमेदवार आहेत. गडचिरोलीमध्ये तीन अपक्ष रिंगणामध्ये आहेत. भंडाराच्या जागेवर काँग्रेसचे प्रशांत पडोले विरुद्ध भाजपचे सुनील मेंढे आहेत. याठिकाणी सुद्धा अपक्ष सर्वाधिक असल्याने हे अपक्ष कोणाची मते खातात याकडे लक्ष असेल. भंडारामध्ये अकरा उमेदवार अपक्ष आहेत.
रामटेकची लढत सुद्धा लक्षवेधी असणार आहे. काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत लोकसभेचे उमेदवारी मिळवली आहे. शिंदे गटात सामील झालेल्या विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांची उमेदवारी कट करून राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे निर्णय रिंगणात आहेत. रामटेकच्या रिंगणामध्ये अपक्ष उमेदवार कोणीही नाही. या मतदारसंघातून काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांचे जात प्रमाणपत्र आणि जात रद्द करण्यात आल्याने काँग्रेस अडचणीत सापडला होता. अखेर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या