Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Supriya Sule : शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि त्यांच्या नात रेवती सुळे यांना बारामती येथील टेक्स्टाईल पार्कमध्ये जाताना त्यांना गेटवरच थांबवण्यात आले. यानंतर सुप्रिया सुळेंनी जोरदार हल्लाबोल केलाय.
Supriya Sule : सध्या बारामती विधानसभा मतदारसंघात (Baramati Vidhan Sabha Constituency) राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे दिसून येत आहे. बारामतीत पवार कुटुंबातील दोन उमेदवार आमनेसामने आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू युगेंद्र पवार (Yugendra Pawar) विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात लढाई होत आहे. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यादेखील युगेंद्र पवारांचा प्रचार करत आहेत. त्यातच आज प्रतिभा पवार आणि त्यांच्या नात रेवती सुळे यांना बारामती येथील टेक्स्टाईल पार्कमध्ये जाताना त्यांना गेटवरच थांबवण्यात आले. जवळपास अर्धा तास प्रतिभा पवार आणि रेवती सुळे (Revati Sule) गेटवरच थांबल्याचे दिसून आले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझी आई प्रतिभा पवार आणि माझी मुलगी रेवती सुळे या दोघी बारामतीतल्या टेक्सटाइल पार्कमध्ये गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांना अर्धा तास थांबवून ठेवण्यात आल्याची मला माहिती कळाली आहे. ज्या शरद पवारांनी बारामतीत हे पार्क उभं केलं, त्या शरद पवारांच्या पत्नीला अर्धा तास त्या ठिकाणी थांबवलं जातंय. आता सत्ता आहे म्हणून हे ठीक आहे, ते लोकांना कसेही वागवू शकतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर अजित पवार यांच्याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे यांनी बोलणे टाळले. राम कृष्ण हरी म्हणत त्यांनी हात जोडले.
बारामती टेक्सटाईल पार्क मध्ये जाण्यासाठी व्हिसा लागतो का? बारामती वेगळा देश घोषित केला का?
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) November 17, 2024
निवडणुकीत इतका राग की प्रतिभा काकीना खरेदीला जाण्यासाठी थांबवले! जे कुटुंबाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार? उद्या मतदान दिले नाही तर बारामतीकराना पाणी, वीज सगळ बंद करणार का? pic.twitter.com/16B4i2eyqv
अर्ध्या तासाने आत सोडले
दरम्यान, प्रतिभा पवार आणि रेवती सुळे शॉपिंग करण्यासाठी बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये आल्या होत्या. त्यांची गाडी गेटवर आल्यानंतर अडवण्यात आली. त्याचबरोबर गेट पुढे केलं असा दावा व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. तर गेटवर असलेल्या सुरक्षारक्षकाला त्यांनी याबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी जास्त काही उत्तर दिली नसल्याचं दिसून आलं. आम्हाला वरुन आदेश आलेत, फोन आला, त्यामुळं गेट लावलं असं गेटवर तैनात असलेला सुरक्षारक्षकाने यावेळी सांगितल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. जवळपास अर्ध्या तासांनी सुरक्षारक्षकाने प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांना आत सोडलं. या अडवणुकीचे कारण समजू शकलेलं नाही. त्यांना नक्की का अडवले? आता यावर बारामतीत जोरदार चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे.