Sharad Pawar : निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह मविआच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली.
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर आणि भुसावळ विधानसभा मतदारसंघातील मविआच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत शरद पवार यांनी रोहिणी खडसे, धनंजय चौधरी आणि राजेश मानवटकर यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. शरद पवार यांनी या सभेत संविधान बदलण्याचा भाजपचा प्रयत्न, राज्यातील शेतकऱ्यांची दुरावस्था आणि महिला सुरक्षेच्या मुद्यावरुन सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
शरद पवार म्हणाले, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. देशाच्या लोकसभेची निवडणूक काही महिन्यांपूर्वी पार पडली. राज्यात चांगला अनुभव आला, जळगाव जिल्हा थोडा मागं राहिला. ती निवडणूक महत्त्वाची होती. देशाच्या कारभार कुणी कसा चालवायचा हा विचार होता. नरेंद्र मोदी ठिकठिकाणी जाऊन सांगत होते आम्हाला चारशे जागा द्या, कारभार चालवण्यासाठी चारशे जागांची आवश्यकता नाही. मात्र नरेंद्र मोदींच्या मनात नक्की काय याची शंका अनेकांच्या मनात येत होती, असं शरद पवार म्हणाले.
संविधानात बदलाचं वक्तव्य हेगडेंनी केलेलं : शरद पवार
ते सतत चारसो पार घोषणा देत होते. शंका ही होती या देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली, त्या घटनेवर हल्ला होण्याची शंका अधिक संख्या कुणाच्याही हाती असली तर नाकारता येत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं. ही शंका अनेकांच्या मनात येत होती, त्याला कारणं आहेत. मोदी साहेब चारशे पारची गोष्ट करत होते. त्यांचा एक सहकारी मंत्री होते केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते, ते सहकारी कर्नाटकमधले होते, त्यांचं नाव हेगडे असं होतं. हेगडेंनी देशाच्या घटनेत परिवर्तन करायचं आहे, असं सांगितलं, त्यासाठी ते चारशे जागांची गरज असल्याचं सांगत होते. राजस्थान, उत्तर प्रदेशमधील मोदींचे सहकारी हेच सांगत होते, असं शरद पवार म्हणाले. देशातील विरोधी पक्षांचे नेते आम्ही एकत्र बसलो आणि विचार केला संविधानावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही घटना वाचवण्यासाठी एकत्र यावं लागेल, निवडणूक लढवावी लागेल, असा विचार करावा लागेल, असा विचार केल्याचं शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्रात आम्ही एकत्र यायचं ठरवलं, उद्धव ठाकरेंची शिवसेना, राहुल गांधींची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. लोकशाही,संविधानावर संकट येण्याची भूमिका मांडत होतो, त्याला महाराष्ट्राच्या जनतेनं पाठिंबा दिला. 48 पैकी 31 जागा मविआनं जिंकल्या. राष्ट्रवादीनं 10 जागा लढवल्या त्यापैकी 8 जागा विजयी झाल्या, असं शरद पवार म्हणाले.
विधानसभेची निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्याचं सत्ताकारण भाजपच्या हाती आहे. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस होते. त्या काळात महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेचा वापर किती गेला, असा सवाल शरद पवार यांनी केला. या देशात काळ्या आईशी प्रामाणिक राहणारा बळीराजा संकटात आला. जो घाम गाळतो, उत्पादन वाढवतो, प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांच्या भूकेचा प्रश्न सोडवतो, तो महाराष्ट्राचा बळीराजा अडचणीत होता. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे राज्याच्या दृष्टीनं गंभीर दुखणं आहे. गेल्या सहा आठ महिन्यात महाराष्ट्रात 856 लोकांनी आत्महत्या केल्याची बातमी वृत्तपत्रात होती, ते सर्वजण शेतकरी होते, असं शरद पवार म्हणाले.
शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार :शरद पवार
शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी नवा कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज कमी करावं लागेल. शेतकऱ्यांना सन्मानानं जगण्याची संधी द्यावी लागेल. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज माफ करण्याचा निकाल घ्यावा लागेल. देशात मोठे उद्योगपती आहेत, काही उद्योगपतींचं 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं गेलं. महाविकास आघाडीचे लोक एकत्र बसलो होतो. आज सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, मविआच्यावतीनं महिलांसाठी एक कार्यक्रम हाती घ्यायचा आहे. महिलांवरील अत्याचार हे दुखणं अनेक ठिकाणी ऐकायला मिळतं. राज्यातील जवळपास 6 हजार मुली गायब झाल्या, त्यांचा पत्ता लागत नाही, हे चित्र महाराष्ट्रात घडलं, असं शरद पवार म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. शिवाजी महाराजांच्या राज्यात भगिनींची प्रतिष्ठा हे वैशिष्ट्य होतं, तुमच्या माझ्या राज्यात भगिनींसाठी संकटाचं चित्र निर्माण झालेलं पाहायला मिळतं. महालक्ष्मी योजना आणणार आहोत, त्यातून महिलांना 3 हजार रुपये देणार, एसटीतून महिलांना आणि मुलींना मोफत प्रवास एसटीतून देणार आहोत, असंही शरद पवार यांनी सांगितलं.
कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी तीन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करायचं आणि जे नियमित कर्ज भरतात त्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेतला. जातिनिहाय जनगणना करुन आरक्षणावरील 50 टक्क्यांची मर्यादा काढून टाकण्याचा विचार आम्ही केला आहे. बेरोजगार तरुणांना काम मिळेपर्यंत दरमहा चार हजार रुपये आर्थिक मदत करण्याचा निकाल घेतलेला आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
घरात वडीलधारी लोक असतात, दवाखान्यात जावं लागतं. तिथं जे बील येतं त्यातून आजार वाढतो. त्यामुळं 25 लाख रुपयांचा विमा लोकांचा उतरवायचा निर्णय घेतला आहे. आम्ही पाच कलमांवर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत आम्हाला मतांच्या मार्फत शक्ती देत उमेदवार विजयी करावं लागेल.या निवडणुकीकडे साधी निवडणूक म्हणून बघू नका, आजचे राज्यकर्ते तुमच्या प्रश्नाकडे बघत नाहीत, बेरोजगार तरुणांच्या हिताची जपणूक न करणारे आहेत. सत्तेचा वापर शेतकऱ्यांच्या भल्यासाठी करत नाहीत, त्यामुळं आजच्या सत्ताधाऱ्यांकडून सत्ता काढून घेत मविआकडे द्या, मविआच्या उमेदवारांना विजयी करावं, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.
इतर बातम्या :
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'