Patan Assembly Election Result 2024 : शंभूराज देसाईंची हॅटट्रिक, सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव, ठाकरेंच्या उमेदवाराला किती मतं?
Patan : पाटण विधानसभा मतदारसंघात सातत्यानं पाटणकर आणि देसाई यांच्यात लढत होत राहिली आहे. शंभूराज देसाई यंदाच्या निवडणुकीत विजय मिळवला.
सातारा : पाटण विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार हर्षद कदम, अपक्ष उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांच्यात लढत झाली.हर्षद कदम ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असले तरी प्रामुख्यानं लढत शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजितसिंह पाटणकर अशी झाली. या लढतीत शंभूराज देसाई यांनी विजय मिळवला.शंभूराज देसाई यांना 125759 मतं मिळाली. तर, सत्यजितसिंह पाटणकर यांना 90935 मतं मिळाली. हर्षद कदम यांना 9626 मतं मिळाली. तर,शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांचा 34824 मतांनी पराभव केला.
शंभूराज देसाई विजयी
पाटण विधानसभा मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रमसिंह पाटणकर यांनी शंभूराज देसाई यांना पराभूत केलं होतं. त्यानंतर 2014 ची निवडणूक सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली. यावेळी शंभूराज देसाई यांनी विक्रमसिंह पाटणकर यांचा पराभव केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सत्यजितसिंह पाटणकर यांनी शंभूराज देसाईंविरुद्ध निवडणूक लढवली. शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना पराभूत करत विजय मिळवला होता. 2024 मध्ये देखील त्यांनी पराभव केला.
2024 च्या लोकसभेवेळी काय घडलेलं?
पाटण विधानसभा मतदारसंघ हा लोकसभेला सातारा लोकसभा मतदारसंघात येतो. 2019 ची लोकसभा पोटनिवडणूक आणि 2024 ची लोकसभा निवडणूक या दोन्ही वेळेला इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आघाडी मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांना आघाडी मिळाली होती. तर, उदनयराजे भोसले हे या मतदारसंघात पिछाडीवर होते. उदयनराजे भोसले यांना पाटण विधानसभा मतदारसंघात 75460 मतं मिळाली. शशिकांत शिंदे यांना 78403 मतं मिळाली होती.
शंभूराज देसाई यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्यजितसिंह पाटणकर यांना 2024 मध्ये देखील पराभूत केलं आहे.
इतर बातम्या :