Vinod Tawde : विरारच्या त्या हॉटेलमधून 9 लाख 53 हजार रुपये जप्त, चार एफआयआर दाखल, विनोद तावडेंचंही नाव
Vinod Tawde News: महाराष्ट्रात उद्या मतदान होणार असून त्यापूर्वी आज विरारच्या हॉटेलमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पैसे वाटप होत असल्याचा आरोप
Maharashtra Assembly Elections 2024 मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी काही तास उरले आहेत. त्यापूर्वीच आज विरारमधील विवांता हॉटेलमध्ये जोरदार राडा झाला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, नालासोपाराचे भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप बहुजन विकास आघाडीनं केला. हितेंद्र ठाकूर यांनी भाजपमधील शुभचिंतकानं तावडेंबाबत माहिती दिल्याचं म्हटलं. बविआचे कार्यकर्ते विवांता हॉटेलमध्ये पोहोचल्यानं जोरदार राडा झाला. हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक आयोग आणि पोलीस तावडेंवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत त्यांना बाहेर जाऊ देणार नाही, असं म्हटलं होतं. या प्रकरणी एकूण चार एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. तुळिंज पोलिसांनी एफआयआरमध्ये विनोद तावडे यांच्या नावाचा उल्लेख देखील केला आहे.
हॉटेलमध्ये पत्रकार परिषद ते पैसे वाटण्याच्या आरोपावरून एकूण चार एफआयआर दाखल झाल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पहिली एफआयआर विनोद तावडे आणि राजन नाईक यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 223 आणि 173 आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 126 नुसार तक्रार दाखल करण्यात आळी आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 9 लाख 53 हजार रुपये जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दुसऱ्या एफआयरमध्ये विनोद तावडे आणि भाजप उमेदवार राजन नाईक यांच्या विरोधात आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 223 आणि लोकप्रतिनिधी कायदा कलम 126 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसऱ्या एफआयआरमध्ये राजन नाईक, विनोद तावडे, हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 223 आणि लोकप्रतिनिधी कायदा कलम 126 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौथी एफआयआर क्षितिज ठाकूर, प्रतिक ठाकूर यांच्यासह इतर 5-6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सुदेश चौधरी यांनी त्यांना विवांता हॉटेलमध्ये क्षितिज ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं म्हटलं. या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय न्याय संहितेचे 118(1), 189 (2), 189 (3) आणि 115 लावण्यात आलं आङे.
विनोद तावडे काय म्हणाले?
विनोद तावडे यांनी त्या ठिकाणाहून जात असताना राजन नाईक यांनी फोन करुन चहा पिण्यासाठी बोलावलं होतं. जे कार्यकर्ते दिवसरात्र काम करतात त्यांच्यासोबत चहा पिण्यासाठाी जाणं चुकीचं नाही. सीसीटीव्ही फुटेजची चौकशी व्हायला हवी. मी 40 वर्षांपासून पक्षासाठी काम करतोय. माझ्यावर पैसे वाटपाचे आरोप लागले नाहीत, असं विनोद तावडे म्हणाले.
इतर बातम्या :