(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray : पंकजाताई तू एक फार मोठं काम केलंस, महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस, उद्धव ठाकरेंनी आभार मानले, कारण...
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सभेत पंकजा मुंडे यांचे आभार मानत असल्याचं म्हटलं. पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या डोळ्यावरील पट्टी काढल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई : महाविकास आघाडीची मुंबईत सभा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी या सभेत बोलताना पंकजा मुंडे यांचा विशेष उल्लेख केला. आपण जिंकणार आहोत पण राज्यभर फटाके फुटणार आहेत पण जर महाझुठी जिंकली तर गुजरातमध्ये फटाके फुटणार आहेत. पण, पंकजा मुंडे आज किंवा काल बोलल्या आहेत, त्याचा व्हिडीओ आहे. पंकजाताई तू एक फार मोठं काम केलंस, महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस, जशी आमच्या चंद्रचूड साहेबांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरुन काढून स्वत:च्या डोळ्यावर बांधली होती, तशी तू आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरील पट्टी काढली, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पंकजा मुंडे यांनी काय सांगितलं, त्यांचे शब्द वेगळे आहेत, मी त्या काय म्हणाल्या ते सांगतो, किती आहेत बुथ आपल्याकडे 90 हजार, प्रत्येक बुथवरती भाजपचं दक्षता पथक आहे. 90 हजार बुथवर दक्षता पथकं म्हणजे एकापेक्षा अधिक माणसं असणार, एक माणूस धरला तर 90 हजार माणसं, दोन धरली तर 1 लाख 80 हजार, तर तीन असतील तर त्याच्या पटीत असतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
इथली भाजप हरलीय
सगळी माणसं गुजरातमधून माणसं महाराष्ट्रात आणली आहेत. ही माणसं आज नजर ठेवायला आणली आहेत. उद्या आपली मुंबई आणि महाराष्ट्र बळकवण्याचा यांचा डाव आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. हे तर काही फेक नरेटिव्ह नाही, पंकजा मुंडे बोलल्यानंतर मी बोलतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. याचा अर्थ असा की इथली भाजप हरलेली आहे, इथल्या भाजपमध्ये लोक राहिलेले नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या भाजपच्या प्रेमींवर भाजपच्या नेतृत्त्वाचा विश्वास नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. मराठी माणसावर, गुजराती आणि उत्तर भारतीयांवर विश्वास नाही. कोणावरचं विश्वास नाही. परराज्यातून माणसं आणून नजर ठेवत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केला. माझा आणखी एक प्रश्न आहे. अनेक निवडणुका बघितल्या, शिवसेनेचा स्टार प्रचारक म्हणून फिरतोय. किमान दोन ते तीन वेळा माझी बॅग तपासली गेली. त्या बॅगच्या कंपनीला पत्र लिहिणार आहे. ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमा असं सांगणार आहे. बॅग हो तो ऐसी हो सबको लगे चेक करो. माझ्या बॅगा तपासल्या हरकत नाही, हे जे पथक फिरतंय, रात्री राहतात कुठंय, त्यांचा खर्च कोण करतंय, ते जे फिरतात त्यांच्या बॅगातील ढोकळे फाफडा कुठून आणलाय, कुणासाठी फिरतात, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
राजनाथ सिंह रावणाचा, कंसाचा वध नरेंद्र मोदींनी केला म्हणतील
रात्रीच्या बैठका चालल्यात, आढावा घेत आहेत. या देशात आजपर्यंत कुठलीही निवडणूक दुसऱ्या राज्यातील निवडणूक आणून, माणसं आणून ज्या राज्यात मतदान होत आहे, त्या मतदारांवर लक्ष्य ठेवण्यासाठी अशी फौज अद्याप आणली नव्हती, असं उद्धव ठाकरे म्हणाले. राजनाथ सिंह यांचं आश्चर्य वाटतं, देशाचे संरक्षणमंत्री त्यांनी सांगितलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोदींनी भारतरत्न दिला, उद्या ते असंही सांगतील की, रावणाचा आणि कंसाचा वध नरेंद्र मोदींनी केला. अफजलखानाला पण नरेंद्र मोदींनी मारलं असं राजनाथ सिंह सांगतील असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
इतर बातम्या :