Satara Vidhana Sabha : साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले यांचा दणदणीत विजय, राज्यात सर्वाधिक 142124 मतांनी बाजी मारली, अमित कदम यांचा पराभव
Satara Assembly Seat : सातारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले विजयी झाले आहेत. शिवेंद्रराजे भोसले यांनी 1 लाख 42 हजार 124 मतांनी विजय मिळवला आहे.
सातारा : सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून (Satara Vidhan Sabha) भाजपचे शिवेंद्रराजे भोसले यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सातारा विधानसभा मतदारसंघात त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अमित कदम यांचा पराभव केला आहे. शिवेंद्रराजे भोसले विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा विजयी झाले आहेत. शिवेंद्रराजे भोसले यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला आहे. शिवेंद्रराजे भोसले यांना 1 लाख 42 हजार 124 मतांनी विजय मिळाला आहे.
सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रराजे भोसले भाजपकडून निवडणूक लढवत होते ते पाचव्यांदा विजयी झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमित कदम विधानसभेच्या रिंगणात होते. त्यांना या निवडणुकीत फार यश मिळालं नाही. सातारा विधानसभा निवडणुकीसाठी 217700 इतकं मतदान झालं आहे. शिवेंद्रराजे भोसले यांना 176849 मतं मिळाली. तर, अमित कदम यांना 34725 मतं मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या बबन कर्डे यांना 2772 मतं मिळाली. बसपाच्या मिलिंद कांबळे यांना 1165 मतं मिळाली. रासपच्या शिवाजी माने यांना 606 मतं मिळाली. अभिजित बिचुकले यांना 529 मतं मिळाली. कृष्णा पाटील यांना 516 मतं मिळाली.गणेश जगताप यांना 504 मतं मिळाली. तर,नोटाला 2419 मतं मिळाली आहेत.
शिवेंद्रराजे भोसले पाचव्यांदा आमदार निश्चित
सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रराजे भोसले 2004 निवडणुकीत विजयी झाले होते. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत मतदारसंघ पुनर्रचना करण्यात आली होती. त्यामध्ये सातारा शहर, जावळी तालुक्यतील गावं आणि सातारा जिल्हा परिषदेचे शेंद्रे आणि परळी हे दोन गट मिळून सातारा जावळी विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला. शिवेंद्रराजे भोसले यांनी 2009,2014 आणि 2019 मध्ये या मतदारसंघात विजय मिळवला आहे. पहिल्या तीन निवडणुकांमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. तर, 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदारकीचा राजीनामा देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या चिन्हावर देखील ते विजयी झाले. शिवेंद्रराजे भोसले यांनी पाचवी निवडणूक 1 लाख 42 हजार 124 मतांनी जिंकली आहे.
शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले एकत्र
साताऱ्यातील राजघराण्यातील सत्तासंघर्ष अनेक वर्ष सातारकरांनी पाहिला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी यापुढं राजकीय संघर्ष होणार नाही,असा शब्द त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला होता. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे एकत्र आल्याचा देखील विधानसभा निवडणुकीत फायदा होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत दोन्ही राजांच्या मनोमिलनाचं प्रतिबिंब पाहायला मिळालं. दोन्ही राजे एकत्र आल्यानं शिवेंद्रराजे भोसले यांच्या मताधिक्क्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
इतर बातम्या :