Palghar News : श्रीनिवास वनगांनतर माजी आमदार गायब, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले भाजपचे अमित घोडा 24 तासांपासून नॉट रिचेबल
Amit Ghoda : पालघरमधील नेत्यांची नॉट रिचेबल होण्याची मालिका सुरु झाली आहे. भाजपचे माजी आमदार अमित घोडा सध्या नॉट रिचेबल आहेत. गेल्या 24 तासांपासून ते बेपत्ता आहेत.
पालघर : राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यावेळी पालघर विधानसभा मतदारसंघ राज्यभर चर्चेत आहे. शिवसेनेतील बंडावेळी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे आमदार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारल्यानंतर जे घडलं त्यामुळं पालघरची जोरदार चर्चा सुरु होती. पालघरमधून उमेदवारी नाकारताच श्रीनिवास वनगा यांनी पहिल्यांदा उद्धव ठाकरे देवमाणूस असल्याचं म्हणत त्यांची माफी मागायची असल्याचं म्हटलं. त्यानंतर ते काही दिवस संपर्काबाहेर होते. श्रीनिवास वनगा यांनी पुन्हा भूमिका बदल एकनाथ शिंदेंसोबत असल्याचं म्हटलं. एक प्रकरण शांत होत असतानाच भाजप नेते माजी आमदार अमित घोडा नॉट रिचेबल झाले आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. लवकरच प्रचाराला सुरुवात होणार आहे. पण पालघरमध्ये नॉट रिचेबल होण्याचा ड्रामा सुरूच आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते श्रीनिवास वनगा तिकीट न दिल्यामुळे चार दिवस बेपत्ता झाले होते. आता पालघरमध्येच आणखी एक उमेदवार मागील 24 तासांपासून बेपत्ता आहे. त्यांचं नाव माजी आमदार अमित घोडा आहे.
भाजप नेते माजी आमदार अमित घोडा यांनी पालघर विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते गेल्या 24 तासापासून नॉट रीचेबल झाले आहेत त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीत ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. त्यांनी भाजपाकडून आयात करण्यात आलेल्या माजी खासदार शिवसेनेचे राजेंद्र गावित यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
अमित घोडा अर्ज कायम ठेवणार?
अमित घोडा सध्या नॉट रिचेबल असून उमेदवारी अर्ज मागं घेण्याची तारीख 4 नोव्हेंबर आहे. त्या दिवसापर्यंत अमित घोडा यांनी माघार न घेतल्यास पालघरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळेल. महाविकास आघाडी कडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून जयेंद्र दुबळा निवडणूक लढवत आहेत. श्रीनिवास वनगा यांना विधानपरिषदेवर घेण्याचा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती समोर आली होती. आता, वनगांच्यानंतर अमित घोडा यांची समजूत कशा प्रकारे काढली जाणार हे पाहावं लागेल.
प्रचाराचा जोर वाढणार
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं 4 नोव्हेंबरची तारीख महत्त्वाची आहे. त्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतली जातील. यानंतर 5 नोव्हेंबरपासून 18 नोव्हेंबर पर्यंत राज्यभरात प्रचाराचा धुरळा उडालेला पाहायला मिळेल. महाराष्ट्रात एका टप्प्यात सर्व जागांवर मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
इतर बातम्या :