DK Shivkumar : तुमच्यासाठी विशेष विमान अन् बसची सोय करतो, कर्नाटकला येऊन सत्य जाणून घ्या, भाजपच्या जाहिरातीनंतर डीके शिवकुमार यांचा मराठीतून पलटवार
DK Shivkumar : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांना इशारा दिला आहे. भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माफी मागावी, असं ते म्हणाले.
DK Shivkumar मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झालेली असतानाच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मराठीमध्ये एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन महाराष्ट्रातील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आव्हान दिलं आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांना कर्नाटकमधील काँग्रेस सरकारनं राबवलेल्या योजनांबद्दल संशय असल्यास विशेष विमानाची आणि बसेसची व्यवस्था करुन देऊ, कर्नाटकात येऊन आमच्या लोकांसोबत संवाद साधून सत्य जाणून घ्या, असं डीके शिवकुमार म्हणाले आहेत. भाजप, शिवेसना आणि महायुतीच्या नेत्यांनी जनतेची माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाईचा विचार करावा लागेल, असा इशारा देखील डीके शिवकुमार यांनी दिला. भाजपकडून एका मराठी वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या एका जाहिरातीत कर्नाटक, तेलंगाणा आणि हिमाचल प्रदेशच्या योजनांबाबत उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर आता डीके शिवकुमार यांनी मराठीत ट्वीट करत इशारा दिला आहे.
डीके शिवकुमार यांची एक्स पोस्ट जशीच्या तशी
कर्नाटक हे संपूर्ण देशासाठी एक आदर्श राज्य आहे, कारण इथे केंद्र सरकारच्या महागाईमुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही खात्रीशीर योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्रातील भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या जनतेची फसवणूक करत, आमच्या हमी असलेल्या योजनांची नक्कल करण्यापर्यंत ते गेले आहेत. ही बसवण्णांची भूमी आहे, आम्ही आमच्या जनतेला दिलेले वचन पाळले आहे. याबाबत कोणालाही शंका असेल, तर मी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी विशेष विमान किंवा बसेसची व्यवस्था करीन, जेणेकरून ते कर्नाटकात येऊन आमच्या लोकांशी संवाद साधू शकतील आणि सत्य जाणून घेऊ शकतील!
आमच्या 1.22 कोटी महिलांना ‘गृहलक्ष्मी’ योजनेतून दरमहा 2000 रुपये मिळत आहेत. 1.64 कोटी कुटुंब ‘गृहज्योती’ योजनेचा लाभ घेत आहेत. 4.08 कोटी लोकांना ‘अन्नभाग्य’ योजनेअंतर्गत मोफत तांदूळ दिले जात आहे. ‘शक्ती’ योजनेद्वारे 620 कोटी महिलांनी मोफत प्रवास केला आहे. ‘युवा निधी’ योजनेद्वारे 5 लाख विद्यार्थ्यांना महिन्याला 3000 रुपये मिळत आहेत.
दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी, अशी माझी मागणी आहे. अन्यथा, आम्हाला कायदेशीर कारवाईचा विचार करावा लागेल.
डीके शिवकुमार यांची एक्स पोस्ट
कर्नाटक हे संपूर्ण देशासाठी एक आदर्श राज्य आहे, कारण इथे केंद्र सरकारच्या महागाईमुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही खात्रीशीर योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्रातील भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या जनतेची फसवणूक करत, आमच्या हमी असलेल्या योजनांची नक्कल…
— DK Shivakumar (@DKShivakumar) November 7, 2024
इतर बातम्या :