Jayant Patil : मविआच्या जागावाटपाचा 85-85-85 चा फॉर्म्युला नेमका काय? जयंत पाटील यांनी लॉजिक सांगितलं, म्हणाले...
Jayant Patil : महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये तीन प्रमुख पक्षांनी 85-85-85 चा फॉर्म्युला जाहीर केला होता. त्यावरुन चर्चा रंगल्या होत्या.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या नावांची घोषणा केली आहे. जयंत पाटील यांच्याकडून 45 नावांची घोषणा करण्यात आली. यादी जाहीर केल्यानंतर त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. 85 गुणिले तीन केलं तर 270 होत नाही, त्या 255 होतात. त्या निर्णायक झालेल्या आहेत. कालच्या बैठकीनंतर आमच्यामध्ये अदलाबदल करण्यात आल्या आहेत. आज सकाळी काही दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहे. आमचे मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी बोलणं सुरु आहे. शेकाप, दोन्ही डावे पक्ष आणि समाजवादी पार्टी यांच्याशी आमच्या यापूर्वी दोनदा बैठका झाल्या आहेत. काल बराच उशीर झाला म्हणून आम्ही त्यांना बोलावलं नाही. मित्रपक्षांसोबत उद्या चर्चा करु आणि ते पूर्ण होईल. आम्ही 270-275 पर्यंत पोहोचलो हे सांगतो कारण आम्ही मित्रपक्षांना काही जागा सोडणार आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
निवडणूक फक्त 20 दिवसांमध्ये होणार आहे, त्यामुळं पुढचं विचारा, असं जयतं पाटील म्हणाले. आम्हाला सगळ्यांना महाराष्ट्रात बहुमत आणण्यासंदर्भात प्रयत्न करायचे आहेत. आमच्यात काही वाद नाही, स्पर्धा नाही. काही जागांची अदलाबदल झालेली आहे. आमचा संयुक्त जाहीरनामा येईल, त्यावेळी आपल्या लक्षात येईल, आम्ही कशाच्या ताकदीवर लढतोय, असं जयंत पाटील म्हणाले.
बारामतीत लोकांच्या मागणीवरुन युगेंद्र पवारांना संधी
आम्ही मित्र पक्षांसोबत चर्चा केलेल्या आहेत. जागा वाटपाच्या चर्चा उद्या पूर्ण होतील. कोणता पक्ष किती जागा लढवणार हे सांगता येणार नाही, कारण रोज त्यात बदल होत आहेत. बारामतीमधील लोकांच्या मागणीवरुन युगेंद्र पवार यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. युगेंद्र पवार तरुण आणि सुशिक्षित उमेदवार आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातील लोक त्यांना पाठिंबा देतील. तुम्हाला अनपेक्षित असलेला निकाल बारामतीत लागेल, असं जयंत पाटील म्हणाले.
आम्ही महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, शेतमालावर लावलेली जीएसटी, केंद्रानं शेतकऱ्यांना न केलेली मदत या मुद्यांवर लढणार आहोत. राज्यातील शेतकऱ्यांच्या बाजूनं राहाणारी आघाडी म्हणून लोक महाविकास आघाडीकडे बघतात. भाजप शेतकऱ्यांच्या विरोधात काम करतं त्यांचा पराभव करण्याची इच्छा वेगळा विचार करणाऱ्यांच्या मनात आहे की नाही, असं जयंत पाटील म्हणाले.
सांगोल्याच्या जागेवर शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांना मिळणं आवश्यक आहे, त्यामुळं त्यांचा आग्रह आहे. शिवसेनेचे तिथं विद्यमान आमदार होते, त्यामुळं त्या जागेवर शेकाप आणि शिवसेनेत चर्चा सुरु आहेत. परांडा येथील जागा शिवसेनेनं आम्हाला दिली आहे. पाटणला देखील सत्यजितसिंह पाटणकर विजयी होण्याची क्षमता असलेले नेते आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.
इतर बातम्या :