(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gunaratna Sadavarte : देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत ही माझी भावना, गुणरत्न सदावर्तेंची भाजपकडे मागणी; जरांगेंना इशारा देत म्हणाले...
Gunaratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर मनोज जरांगे यांचं आंदोलन यावर भाष्य केलं. याशिवाय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असं ते म्हणाले.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत, असं सदावर्ते यांनी म्हटलं. याशिवाय त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनोज जरांगे यांच्याबद्दल भाष्य केलं.
अॅड. गुणरत्न सदावर्ते मनोज जरांगेंवर काय म्हणाले?
मनोज जरांगे हे स्क्रिप्टेड बोलतात. हा माणूस आहे ना त्याचा बोलवता धनी शरद पवार असल्याचं सदावर्ते म्हणाले. मतमोजणी अगोदर आंदोलनाची तारीख, उपोषणाची तारीख जाहीर करणं मनोज जरांगेंना कसं सुचलं, असं अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले. एखाद्या व्यक्तीला टार्गेट करुन , एखाद्याच्या समाजाला टार्गेट करुन वागण्याचा प्रयत्न करत आहेत, ते महाराष्ट्रात चालणार नाही. 204 निवडून आले, मी आरक्षण घेणार, उपोषण करणार हे सांगत आहे हे मनोज जरांगे सांगत आहे पण डंके की चोट पे सांगतो, तुझी शक्ती दाखवं असं आव्हान अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. मनोज जरांगे नावाचा फॅक्टर ,204 बोलत आहे, एक लाख लोकांना उपोषांना बसवणार, पोलीस कुठून आणणार, डॉक्टर कुठून आणणार, यंत्रणेला वेठीस धरणं हाच जरांगे फॅक्टर आहे. 204 आमदारांना समाज, जात म्हणून वागता येणार नाही. संविधान म्हणून वागावं लागले. जरांगे फॅक्टर आणि हे आमदार तर त्यावेळी ओबीसींच्या संरक्षणासाठी उभं राहावं लागेल, असं अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
मनसेबद्दल अॅड. गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?
प्रत्येक राजकीय पक्षाला नियमावली आहे, त्या नियमावली प्रमाणं मतदानाची टक्केवारी ठरलेली आहे. राज ठाकरेंचा पक्ष किती वेळ राजकारण करतो हा चिंतेचा विषय आहे. राज ठाकरेंच्या पक्षाला आमदार निवडून आणता आलेले नाहीत. त्यांचं मान्यता टिकवण्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ नाही. मनसेची मान्यता गेल्यानंतर त्यांची पत जाईल आणि राजकीय पक्ष म्हणून फायदा घेता येईल तो घेता येणार नाही, असं अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलं.
अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या मनातील मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे, ही माझी भावना आहे. भाजपला मी विनंती करतो की लोकांच्या जनभावना लक्षात घ्या, मतदारांच्या भावना लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे, असं अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं म्हणून आरएसएसला विनंती करणार असल्याचं अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
इतर बातम्या :