एक्स्प्लोर
सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार?
भाजपला मराठवाड्यात एक मुस्लिम चेहरा हवा आहे. भाजप अब्दुल सत्तार यांना अप्रत्यक्ष मदत करून अपक्ष म्हणून निवडून आणू शकते. त्याचबरोबर अब्दुल सत्तार हेदेखील मराठवाड्यातल्या अनेक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार उभे करून भाजपला मदत करू शकतात.
लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक चर्चिलं गेलेलं नाव म्हणजे आमदार अब्दुल सत्तार. अब्दुल सत्तार या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात तो मतदारसंघ म्हणजे सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ औरंगाबाद जिल्ह्यात असला तरी लोकसभेला हा मतदारसंघ जालना लोकसभेमध्ये येतो. त्यामुळे सिल्लोड आणि भोकरदन यांचं साटलोट्याचं राजकारण अवघ्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याला परिचित आहे. यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळाले. यात अब्दुल सत्तार यांचा 'हात'भार लागल्याचे बोलले जात आहे. सत्तार यांनी सुरुवातीला दानवे यांच्या विरोधात दंड थोपटले. दानवे निवडणूकीत पडत नाहीत, तोपर्यंत डोक्यावर केस ठेवणार नाही अशी शपथ घेतली. पण ज्या अर्जुनाच्या जीवावर श्रीकृष्ण म्हणून ही लढाई जिंकण्यासाठी रणात सत्तार उतरले होते त्याच अर्जुनाने बाण भात्यात ठेवल्याने डोक्यावरच्या केसांचा भांग पाडण्यासाठी रावसाहेब दानवे यांच्याकडे कंगवा मागण्याची वेळ त्यांच्यावर आली.
सत्तार हे सिल्लोड- सोयगाव विधानसभा भाजपाकडून लढतील अशी काही दिवस जोरदार चर्चा होती. काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत ते भाजपात प्रवेश करतील असंही म्हटलं जात होतं. पण तसं काही झालं नाही. सत्तार यांनी गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री यांच्याकडे अनेक चकरा मारल्या. मात्र अद्याप त्यांना भाजपात स्थान मिळालं नाही. त्यामुळेच सत्तार यांच्या हातातून काँग्रेसचा हात सुटला आहे. अपक्ष लढ्यावर सत्तार साशंक आहेत.
गेल्या दशकभरात या मतदारसंघांमध्ये अब्दुल सत्तार विरुद्ध भाजप असाच सामना रंगत आला आहे. भाजपमधून सत्तार यांच्या प्रवेशाला होत असलेला विरोध त्यांच्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे आणि त्यामुळेच 2019 च्या लढाईत अब्दुल सत्तार कोणाकडून लढणार याचीच मतदारसंघांमध्ये सर्वाधिक चर्चा सुरू आहे. असं असलं तरी गेल्या दशकामध्ये या मतदारसंघात सत्तार यांनी आपली एक वोटबँक तयार केली आहे. या मतदारसंघांमध्ये चाळीस हजारांपेक्षा अधिक असलेला मुस्लिम मतदार सत्तारांसोबत राहील असा त्यांना दृढ विश्वास आहे.
अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस सोडली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रभाकर पालोदकर हे या मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी मिळाल्यास या मतदारसंघातून तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. प्रभाकर पालोदकर यांच्याबरोबरच श्रीराम महाजन ,विजय गौंड यांनीही या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या सर्व उमेदवाराला या मतदारसंघातील मुस्लीम मतं मिळतील असा विश्वास आहे.
भाजपकडून देखील या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र त्यांना सर्वात मोठी अडचण अब्दुल सत्तार यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास दहा वर्षात सत्तार यांच्या विरोधात लढलेले भाजपचे नेते विरोधात उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपकडून गत निवडणुकीमध्ये उभा असलेले सुरेश बनकर, सांडू पाटील लोखंडे, ज्ञानेश्वर मोठे ,सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन इद्रिस मुलतानी यांची नावे आघाडीवर आहेत.
युती न झाल्यास शिवसेना ऐन वेळी अन्य पक्षातील नाराज उमेदवाराला देखील संधी देऊ शकते तर वंचित कडून एमआयएमचे तालुका अध्यक्ष बनेखा पठाण देखील या निवडणुकीत उभा राहिलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात.
या मतदारसंघामध्ये अजिंठ्याच्या लेणी आहेत. या लेणी पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक अजिंठा येथे भेट देतात. मात्र या रस्त्यावरून पर्यटकांना प्रवास करावा लागतो तो औरंगाबाद जळगाव महामार्गाचे काम रखडल्याने वर्षभरापासून पर्यटकांसह नागरिकही त्रस्त आहेत. सिंचनाचा मोठा प्रकल्प नसल्याने या भागात पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जातं. त्यामुळे पाऊस पडूनही शेतकऱ्यांना याचा फायदा होत नाही. निम्मा तालुका टँकरवर आपली तहान भागवतो.
2014 मधील विधानसभा निवडणुकीमध्ये काय स्थिती होती?
अब्दुल सत्तार (काँग्रेस) : 96 हजार 038 मतं
सुरेश बनकर (भाजप) : 82 हजार 117 मतं
सुनील मिरकर (शिवसेना) : 15 हजार 909 मतं
दीपाली काळे (मनसे) : 3465 मतं
शिवसेना-भाजप एकत्र लढले तर काँग्रेसकडून किंवा अपक्ष जरी अब्दुल सत्तार उभा राहिले तर त्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र यातही सत्तार यांना रावसाहेब दानवे यांनी लोकसभेची परतफेड केली तर निश्चितच वेगळे चित्र पाहायला मिळू शकते.
लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून कोणाला सर्वाधिक पसंती?
रावसाहेब दानवे (भाजप) : 1 लाख 24 हजार 813 मतं
विलास औताडे (काँग्रेस) : 44 हजार 998 मतं
रावसाहेब दानवे यांना या मतदारसंघातून जे मताधिक्य के मिळालं यामध्ये अब्दुल सत्तार यांचा वाटा होता हे सांगण्यास कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. असं असलं तरी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात अब्दुल सत्तार कोणत्या पक्षाकडून उभा राहणार याची सर्वाधिक चर्चा आहे. आजही मतदारसंघात चर्चा आहे की अब्दुल सत्तार हे निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करतील. भाजपलाही मराठवाड्यात एक मुस्लिम चेहरा हवा आहे. असं जर झालं नाही तर भाजप अब्दुल सत्तार यांना अप्रत्यक्ष मदत करून अपक्ष म्हणून निवडून आणू शकते. त्याचबरोबर अब्दुल सत्तार हेदेखील मराठवाड्यातल्या अनेक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार उभे करून भाजपला मदत करू शकतात आणि याची परतफेड अब्दुल सत्तार यांना निवडणुकीनंतर मिळेल असही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. सिल्लोड-सोयगाव विधानसभा निवडणुकीत 2019 मध्ये कोण बाजी मारणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेले असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
परभणी
जळगाव
राजकारण
Advertisement