श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ | राष्ट्रवादीच्या ताब्यात गेलेला गड बबनराव पाचपुते परत मिळवणार?
बबनराव पाचपुते यांनी गेल्या 5 वर्षांपासून विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत श्रीगोंदा मतदारसंघातून भाजप खासदार सुजय विखे यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे या निवडणुकीत श्रीगोंदा मतदारसंघात विखेची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.
अहमदनगर : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी भाजप उमेदवार बबनराव पाचपुते यांना पराभूत करून विजय मिळवला आहे. 2014 पर्यंत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा श्रीगोंद्याचे माजी आमदार बबनराव पाचपुते यांचा बालेकिल्ला होता. सध्याची टर्म सोडली तर त्याआधी सलग 6 टर्म बबनराव पाचपुते हे आमदार राहिले होते. विशेष म्हणजे 6 वेळा पाचपुते यांनी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवली. 2009 साली बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून येत श्रीगोंद्याचे आमदार झाले. त्यानंतर आघाडीची सत्ता आल्यावर पाचपुते यांना मंत्रिपद देखील मिळाले. मात्र 2014 साली भाजपची लाट असल्याने बबनराव पाचपुते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बबनराव पाचपुते यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केल्याने श्रीगोंदा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारीची माळ तरुण उमेदवार राहुल जगताप यांच्या गळ्यात पडली. मात्र बबनराव पाचपुते यांच्या भाजप प्रवेशामुळे श्रीगोंद्यातील अनेक राजकीय नेत्यांमध्ये आणि भाजप समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली. याच नाराजीतून श्रीगोंद्यातील पाचपुते सोडून इतर सर्व नेत्यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीकडून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलेल्या राहुल जगताप यांना मदत केली. त्यामुळे पाचपुते यांचा पराभव होऊन राहुल जगताप यांचा विजय झाला. अशारीतीने श्रीगोंदा तालुक्यात पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकला.
श्रीगोंदा मतदारसंघात पराभूत झालेल्या बबनराव पाचपुते यांनी येत्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे विद्यमान आमदार राहुल जगताप यांच्या विरोधात शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले घनश्याम शेलार यांनी आपण राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. वास्तविक पाहता 2014 च्या निवडणुकीत राहुल जगताप यांच्या विजयमागे घनश्याम शेलार यांचा देखील वाटा होता. मात्र आता घनश्याम शेलार यांनीच पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केल्याने राहुल जगताप यांनी डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बबनराव पाचपुते यांनी गेल्या 5 वर्षांपासून विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत श्रीगोंदा मतदारसंघातून भाजप खासदार सुजय विखे यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे या निवडणुकीत श्रीगोंदा मतदारसंघात विखेची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. आता श्रीगोंदा मतदारसंघात बबनराव पाचपुते यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पहावं लागणार आहे. एवढेच नाही तर निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळणार की पुन्हा भाजपकडून पाचपुते हे निवडून येऊन आपला गड परत आपल्या ताब्यात घेणार हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. श्रीगोंदा मतदार संघातील समस्या
- श्रीगोंदा तालुक्यातील सर्वात महत्वाची समस्या आहे ती पाण्याची. साकळाई पाणी योजनेचा प्रश्न गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित आहे. या योजनेतून श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील 35 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
- दुसरी समस्या आहे ती रस्त्याची... श्रीगोंदा तालुक्यातील इतर गावांमध्ये जाणारे रस्त्यांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे.
विधानसभा 2014 मतदानाची आकडेवारी
- राहुल जगताप ( राष्ट्रवादी ) - 99281
- बबनराव पाचपुते ( भाजप ) - 85644
- शशिकांत गाडे ( शिवसेना ) - 22054
- हेमंत ओगले ( काँग्रेस ) - 5113