करमाळा विधानसभा मतदारसंघ | तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? राष्ट्रवादी उमेदवाराच्या शोधात
करमाळा विधानसभा मतदारसंघ रश्मी बागल, संजयमामा शिंदे आणि विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या तिरंगा लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केल्याने वरवर शिवसेनेची ताकद वाढल्याचे चित्र आहे. असे असले तरी या प्रवेशामुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा गट नाराज झाला आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या करमाळा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादीला उमेदवाराच मिळत नसल्याचे चित्र आहे. युतीच्या झंझावातात यंदाही येथे तिरंगी लढत होणार असली तरी राष्ट्रवादीला येथे अस्तित्वासाठी झगडावे लागणार असे चित्र तयार झाले आहे. गेल्यावेळी झालेल्या अटीतटीच्या तिरंगी निवडणुकीत शिवसेनेच्या नारायण आबा पाटील यांनी केवळ 357 मतांनी विजय मिळवत करमाळ्यावर भगवा फडकावला होता. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीच्या रश्मी बागल तर तिसऱ्या स्थानावर भाजप पुरस्कृत संजयामामा शिंदे राहिले होते.
गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केल्याने वरवर शिवसेनेची ताकद वाढल्याचे चित्र आहे. असे असले तरी या प्रवेशामुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा गट नाराज झाला आहे. शिवसेनेच्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे विद्यमान आमदार असताना जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी रश्मी बागल यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने आता तिकिटासाठी विद्यमान आमदाराला झगडावे लागणार आहे. रश्मी बागल यांचा गट करमाळ्यात सर्वात मजबूत गट म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी फौज बागल यांच्याकडे आहे. मात्र त्यांच्या ताब्यात असलेल्या दोन साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. गेल्या 41 महिन्यापासून कामगारांना वेतनच न मिळाल्याने कामगारांची आंदोलने सुरु आहेत. उसाची बिलेही थकल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. या सर्व परिस्थितीचा रश्मी बागल निवडणुकीत सामना करावा लागणार आहे.
याशिवाय राष्ट्रवादी सोडल्याने निष्ठावान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील दुखावले आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांची समजूत काढून कारखान्याचा प्रश्न सोडवणे ही त्यांच्या पुढील महत्वाची जबाबदारी असणार आहे. बागल यांना तिकीट मिळाल्यास विद्यमान आमदार नारायण पाटील यांची बंडखोरी निश्चित मनाली जात आहे. त्यामुळे बागल यांचा प्रवेश शिवसेनेची डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे. याउलट गेल्यावेळी स्वाभिमानीकडून विधानसभा आणि नुकतीच राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयामामा शिंदे हे यंदा अपक्ष निवडणूक रिंगणात उतरायच्या तयारीत आहेत. संजय शिंदे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यासाठी बारामतीमधून बरेच प्रयत्न सुरु असले तरी लोकसभेत पराभूत झाल्यानंतर आता संजयामामा हा धोका घेण्याच्या तयारीत नाहीत.
गेल्या अडीच वर्षात संजयामामा यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी करमाळा विधानसभा मतदारसंघात आणून विकासकामे केल्याने याचा मोठा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्यावेळी एकमेकांच्या विरोधात लढलेले तीनही उमेदवार यंदा पुन्हा निवडणूक रिंगणात असणार असून आता करमाळा येथील मतदारराजा कोणाला कौल देणार हे पाहणे रंगतदार ठरणार आहे.