एक्स्प्लोर
अक्कलकोट विधानसभा | स्वामींच्या नगरीत अभय कुणाला? भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर
काँग्रेसच्या दृष्टीनं हक्काचा बालेकिल्ला अशी अक्कलकोटची ओळख आहे. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे गड हळूहळू ढासळू लागले आहेत. त्याचे थेट परिणाम आता विधानसभेला सुद्धा जाणवू लागले आहेत. म्हणूनच विद्यमान आमदार काँग्रेसचा हात सोडून मतदारसंघात कमळ फुलवण्याच्या तयारीत दिसत आहेत.
स्वामींची नगरी अशी संपूर्ण राज्यात ख्याती असलेलं अक्कलकोट. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असल्यामुळे तितकचं दुर्लक्षित असलेलं आणि तितकच संवेदनशील असा विधानसभा मतदारसंघ. मागील दोन निवडणुकांत खून, विकासापेक्षा हमरीतुमरी, वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप फैरी झाडतं लढविलेल्या निवडणुका या जिल्ह्यातल्या चर्चेचा विषय राहिले आहेत. राज्यात भाजपचा बोलबाला नव्हता तेव्हा 1995 साली स्वर्गीय बाबासाहेब तानवडेच्या रुपानं या मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ फुललेलं. मात्र त्यांच्या निधनानंतर 2009 चा अपवाद वगळला तर काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व राहिलं आहे. काँग्रेसच्या दृष्टीनं हक्काचा बालेकिल्ला अशी अक्कलकोटची ओळख आहे. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे गड हळूहळू ढासळू लागले आहेत. त्याचे थेट परिणाम आता विधानसभेला सुद्धा जाणवू लागले आहेत. म्हणूनच विद्यमान आमदार काँग्रेसचा हात सोडून मतदारसंघात कमळ फुलवण्याच्या तयारीत दिसत आहेत.
2014च्या लोकसभेच्या मोदी लाटेनंतर विधानसभेत सुद्धा भाजपचा कमळ फुललं. मात्र अक्कलकोट मतदारसंघ त्याला अपवाद ठरला. 2014 साली सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेसचा गड परत मिळवला. मात्र गेल्या चार वर्षात इथली राजकीय समीकरणांची उलथापालथ झाली आहे. आता म्हेत्रे स्वत:च भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं आहे. म्हेत्रे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांच्याशी कोणत्या पक्षात राहावं याविषयी चर्चा केली. कार्यकर्त्यांची येथे इच्छा असेल तेथे जाऊ असे म्हणत जणू भाजप प्रवेशाचा सूचक इशाराच दिला. आषाढी वारीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे सोलापूर विमानतळावर आवर्जून उपस्थित होते. त्यावरुन त्यांच्या पक्ष बदलांच्या चर्चांना उधाण आलं आहे. सिद्धाराम म्हेत्रेंनी देखील या चर्चांना थेट नकार दिला नाही उलट भाजपकडून अद्याप विचारणा झाली नाही. ज्यावेळी विचारणा होईल त्यावेळी पाहू असे विधान केल्याने जणू भाजपच्या आमंत्रणाची वाट पाहत असल्याचा सूचक इशाराच दिला.
1997 पासून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचं राजकारण हे पूर्णत: सिद्धाराम म्हेत्रेंच्या अवती भवती घुमत आहे. 1997 च्या पोटनिवडणुकीतून म्हेत्रे यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 2009 ची विधानसभा वगळता त्यांनी अक्कलकोटमधून काँग्रेसला नेतृत्व दिलं. म्हेत्रे यांचा 2009 ला पराभव करणारे भाजपचे सिद्रामप्पा पाटील यांच्यात आडवे विस्तव जात नव्हते. 2014 पर्यंत या दोघांमध्ये मोठी राजकीय खुन्नस होती. 2014 नंतर काही कारणांसाठी सिद्रामप्पा पाटील हे भाजपपासून दुरावले आणि एकमेकांचे राजकीय हाडवैर असलेले म्हेत्रे-पाटील एकत्रित आले. त्यामुळे यांच्या समोर आता कोणाचा निभाव लागणार नाही असे अक्कलकोट तालुक्यात मतदारांचा सूर होता. मात्र याच दरम्यान भाजपतर्फे सचिन कल्याणशेट्टी यांनी संघटनात्मक कार्यावर भर दिला. नगरपरिषदा, पंचायत समिती, बाजार समिती निवडणुकांत भाजपला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले. या साऱ्याचं श्रेय स्थानिक भाजप नेते सचिन कल्याणशेट्टीला दिलं जातं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विद्यमान आ. सिद्धाराम म्हेत्रे आणि भाजपाकडून सचिन कल्याणशेट्टी यांच्यात थेट लढाई होण्याचे जवळपास निश्चित मानले जात होते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा दुसऱ्यांदा भाजपनं दारुण पराभव केला. पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरणाऱ्या नवख्या डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी शिंदेचा पराभव केला. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून महास्वामींना तब्बल 47 हजार मतांचे मताधिक्य मिळाले. त्यावरुन अक्कलकोटमध्ये देखील भाजपची लोकप्रियता वाढली हे स्पष्ट होते. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे अक्कलकोटमधीलच असल्याने त्याचप्रमाणे लिंगायत धर्मगुरु असल्याने म्हेत्रेंना आपल्या विजयाबद्दल धोका वाटणं हे साहजिक आहे. त्यामुळे त्यांनी पक्षबदलाचा निर्णय घेतला असावा आणि म्हेत्रेंसारखा मातब्बर नेता भाजपमध्ये आल्यास सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठी खिंडार पडणार आहे. म्हेत्रेंच्या प्रवेशानंतर जर विधानसभेची उमेदवारी दिली गेली तर स्थानिकांमध्ये नाराजी होईल हे उघडपणे दिसून येत आहे. त्यामुळे सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी आपली नाराजी वारंवार उघडपणे बोलून दाखवली. भाजपा सत्तेत असल्याने मतदारसंघात भाजपचे डझनभर पुढारी आम्हीच खरे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणत उमेदवारीसाठी उंबरठे झिजवत आहेत.
अक्कलकोट मतदार संघात लिंगायत समाज हा सर्वाधिक आहे. त्या खालोखाल दलित आणि मुस्लिम मतदारांची संख्या आहे. अक्कलकोट मतदार संघातील जातीय समीकरणं पाहता लिंगायत समाजाच्या उमेदवारालाच सर्वच राजकीय पक्षांनी प्राधान्य दिलं. जनतेचा कौल ही लिंगायत समाजातील उमेदवारालाच मिळालेला आहे.
एकीकडे भाजपकडे उमेदवारांची भाऊगर्दी झाली असली तरी म्हेत्रे भाजपमध्ये गेल्यास काँग्रेसला उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. दरम्यान लोकसभेत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे सहकारी असणाऱ्या नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी अस्सल राजकारण खेळत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील जातीय समीकरणांचा विचार करता श्रीकंठ शिवाचार्य देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत. आता काँग्रेसतर्फे विधानसभेच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं देखील तितकचं रंजक ठरणार आहे. एकूणच अक्कलकोट मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र जर सिद्धाराम म्हेत्रे यांना भाजप प्रवेश मिळाला तर भाजपमध्येच अंतर्गत वाद पाहायला मिळणार हे नक्की.
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनेदेखील चांगलेच मताधिक्य खेचण्याचा प्रयत्न केला. अॅड. प्रकाश आंबेडकर यांना अक्कलकोटमधून 27 हजार 625 मते मिळाली. वंचितला मिळालेल्या या मतांच्या संख्येमुळेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र लोकसभेत साध्य न झालेली युती विधानसभेत होईल असे चित्र सध्यातरी दिसत नाहीये. जर वंचित आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात युती न झाल्यास त्याचा थेट फटका काँग्रेसलाच बसणार हे मात्र नक्की.
अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील एकूण मतदार
महिला – 1 लाख 62 हजार 768
पुरुष – 1 लाख 79 हजार 157
इतर – 19
एकूण – 3 लाख 41 हजार 944
2014 च्या विधानसभेत मिळालेली मतं
सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस – 97333
सिद्रामप्पा पाटील, भाजप – 79689
2019 च्या लोकसभेत अक्कलकोटमधून उमेदवारांना मिळालेली मते
डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, भाजप – 1 लाख 4 हजार 997
सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस – 57 हजार 488
प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी – 27 हजार 625
भाजपला अक्कलकोटमधून मताधिक्य – 47 हजार 509
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement