कुलभूषण जाधवांना सोडवून आणा आणि 56 इंचाची छाती दाखवा, शरद पवारांचं मोदींना आव्हान
सामान्य माणसाला अधिकार देऊनच आजपर्यंत लोकशाही टिकवली. परंतु या लोकशाहीवरच टाच आणण्याचे काम सत्ताधारी करत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला.
बीड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. पुलवामा हल्ल्यात चाळीस जवान शहीद होतात. जवानांचे रक्त वाया जाऊ देऊ नका, जवानांच्या रक्ताचा बदला घेतला, आनंद झाला. पण आपले चाळीस जवान शहीद झाले तेव्हा 56 इंचाची छाती तपासली का? अशा शब्दात शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधला.
कुलभूषण जाधव यांना सोडवून आणा आणि 56 इंचाची छाती दाखवा, असं आव्हानही शरद पवारांनी यावेळी मोदींना दिलं. कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आष्टी येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
राजकारण समाजकारण करताना माझ्या डोळ्यासमोर घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. सामान्य माणसाला अधिकार देऊनच आजपर्यंत लोकशाही टिकवली. परंतु या लोकशाहीवरच टाच आणण्याचे काम सत्ताधारी करत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला.
धनगर समाजाला आरक्षणाचं आश्वासन अद्याप पूर्ण केलं नाही. मराठ्यांना आरक्षण देतो, फटाके फोडा म्हणाले, तिथेही कोर्टाने स्थगिती दिली. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबतही तेच झालं. सत्ताधारी फक्त फसवतात, अशा धोका देणार्या विचारसरणीच्या हातात सत्ता देऊ नका, असं आवाहन शरद पवारांनी जनतेला केलं.