एक्स्प्लोर
Advertisement
महाराष्ट्रातील 10 व्हीआयपी लढतींचा एक्स्लुझिव्ह एक्झिट पोल! पार्थ पवार, सुप्रिया सुळे, प्रिया दत्त आणि हेमंत गोडसे जिंकण्याचं भाकित
मावळमधून पार्थ पवार तर बारामतीमधून सुप्रिया सुळे, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर, नाशिकमधून शिवसेनेचे हेमंत गोडसे तर नांदेडमधून अशोक चव्हाण विजयी होतील, असा अंदाज एबीपी माझाच्या एक्झिक्ट पोलमधून व्यक्त केला आहे.
मुंबई : लोकसभेच्या निकालाचे वेध सर्वांना लागले आहेत. अनेक वाहिन्यांचे आणि संस्थांचे एक्झिट पोल समोर आल्यानंतर एनडीएचे सरकार स्थापन होण्याचे अंदाज वर्तविले जात आहेत. यातच महाराष्ट्रातील 10 व्हीआयपी लढतींचा एक्स्लुझिव्ह एक्झिट पोल समोर आला आहे.
मावळमधून पार्थ पवार तर बारामतीमधून सुप्रिया सुळे, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर, नाशिकमधून शिवसेनेचे हेमंत गोडसे तर नांदेडमधून अशोक चव्हाण विजयी होतील, असा अंदाज एबीपी माझाच्या एक्झिक्ट पोलमधून व्यक्त केला आहे.
मावळमधून राष्ट्रवादीचे पार्थ पवार विजयी होण्याची शक्यता
मावळमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना पराभूत करत राष्ट्रवादीचे पार्थ पवार विजयी होतील, असा अंदाज या एक्झिट पोलमधून व्यक्त केला आहे. बऱ्याच धामधुमीनंतर अखेर मावळ मतदारसंघातून यावेळी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती. 2014 साली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे तब्बल 5 लाख 12 हजार 226 मतांनी विजयी झाले होते. मात्र यंदा शरद पवारांनी पार्थ पवारांना उमेदवारी देत ही लढत प्रतिष्ठेची बनवली होती.
बारामतीमधून पुन्हा सुप्रिया सुळे विजयी होतील असा अंदाज
बारामतीमधून पुन्हा राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विजयी होतील, असा अंदाज वर्तविला आहे. देशातील प्रमुख लढतींपैकी एक समजल्या जाणाऱ्या बारामती मतदार संघात यंदा सुप्रिया सुळेंसमोर रासप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांचं आव्हान आहे. 2014 मध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना कडवे आव्हान दिले होते. यंदा बारामती लोकसभा मतदार संघ जिंकण्यासाठी यंदा भाजपकडून जोरदार प्रयत्न करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपा पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांनी बारामतीत प्रचार केला आहे.
उर्मिला मातोंडकर, संजय निरुपम, पूनम महाजन पराभूत होतील, असा अंदाज
सर्वांचे लक्ष लागून असलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना पराभवाचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता या पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. या ठिकाणी गोपाळ शेट्टी विजयी होतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर मुंबई मतदारसंघात 2014 मध्ये मोदी लाटेत गोपाळ शेट्टी यांनी संजय निरुपम यांचा पराभव झाला होता.
मुंबईतील उत्तर मध्य मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन यांना पराभव स्वीकारावा लागेल, असा अंदाज सर्वेतून व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या प्रिया दत्त या ठिकाणी विजयी होतील, असा अंदाज आहे. सुरुवातीला प्रिया दत्त यांनी वैयक्तिक कारणं देत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नंतर त्यांनी तो निर्णय बदलला. सुनील दत्त यांच्या निधनानंतर उत्तर मध्य मुंबईमध्ये प्रिया दत्त यांचा विजय झाला होता. परंतु 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत भाजपच्या पूनम महाजन यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा जवळपास 1 लाख 86 हजार मतांना पराभव केला होता.
उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन कीर्तिकर विजयी होतील तर काँग्रेसचे संजय निरुपम हे पराभूत होतील, असा अंदाज सर्वेतून व्यक्त केला आहे. या मतदारसंघात सुनील दत्त यांनी काँग्रेसच्या तिकीटावर इथे 18 वर्ष खासदार होते. या मतदारसंघावर सिनेसृष्टीतील लोकांचाच दबदबा राहिला. पण शिवसेनेने हा दबदबा मोडून काढला आणि 2014 मध्ये इथे विजय मिळवला. 2014 मध्ये शिवसेनेचे गजानन किर्तीकर इथे विजयी झाले.
नांदेडमध्ये पुन्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण बाजी मारणार, असा अंदाज
नांदेडमध्ये पुन्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण बाजी मारतील, असा अंदाज आहे. अशोक चव्हाण हे सुरुवातीला ही निवडणूक लढण्यास उत्सुक नव्हते. मात्र पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिली. चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांचे आव्हान आहे. चव्हाण यांना पराभूत करण्यासाठी नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील सभा झाली होती.
चंद्रपूरमध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना झटका बसण्याचा अंदाज
चंद्रपूरमधून काँग्रेसचे बाळू धानोरकर विजयी होतील, असा सर्व्हेचा अंदाज आहे. या मतदारसंघातून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर पराभूत होणार असल्याचा अंदाज आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर चौथ्यांदा चंद्रपुरातून खासदारपदी विराजमान होण्यास उत्सुक आहेत. मात्र त्यांचा पराभव होईल, असा सर्वेचा अंदाज आहे.
नाशिकमध्ये गोडसे नवा इतिहास करणार?
नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे समीर भुजबळ पराभूत होतील, असा अंदाज आहे, शिवसेनेचे हेमंत गोडसे यावेळीही बाजी मारतील असा अंदाज व्यक्त केला आहे. नाशिककर एकदा निवडून दिलेला लोकप्रतिनिधी दुसऱ्यांदा निवडून देत नाहीत, असा इतिहास आहे. मात्र यंदा हेमंत गोडसे नवा इतिहास रचतील, असा अंदाज आहे. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यात मुख्य लढत असली तरीही बंडखोर अपक्ष माणिकराव कोकाटे यांच्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरली आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या या गडाला शिवसेना-भाजपने सुरुंग लावला होता. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांना पराभूत केले होते.
नागपूरमध्ये पुन्हा गडकरीच येणार
नागपूरमधून नितीन गडकरी हेच विजयी होतील, असा अंदाज आहे. लोकसभा मतदारसंघ हा देशातील राजकारणात सर्वाधिक चर्चा होणाऱ्या मतदारसंघात गणला जातो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि थेट पंतप्रधान तसेच मुख्यमंत्र्यांवर शरसंधान करुन स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये परतलेले नाना पटोले यांच्या लढतीकडे देशाचे लक्ष आहे. 2014 मध्ये नितीन गडकरी यांनी अडीच लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवत नागपूर भाजपकडे खेचून आणला होता. यंदाही गडकरी बाजी मारतील, असा अंदाज आहे.
#ExitPoll2019 महाराष्ट्रातील 10 व्हीआयपी लढतींचा अंदाज, ‘हे’ उमेदवार निवडून येणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement