लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
दुसऱ्या टप्प्यात बीडमध्ये 36, लातुरात 10, बुलढाणा मतदारसंघात 12 उमेदवार, अकोला 11, अमरावती 24, हिंगोली 28, नांदेड 14, परभणी 17, उस्मानाबाद 14 आणि सोलापूर मतदारसंघात 13 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
मुंबई : राज्यात दहा मतदारसंघात गुरुवारी (18 एप्रिल) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात 1 कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून 20 हजार 716 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी सुमारे 2100 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार आहे.
या टप्प्यातील सर्वाधिक 36 उमेदवार बीड मतदार संघात असून सर्वात कमी 10 उमेदवार लातूर मतदार संघात आहेत. याव्यतिरिक्त बुलढाणा मतदारसंघात 12 उमेदवार, अकोला 11, अमरावती 24, हिंगोली 28, नांदेड 14, परभणी 17, उस्मानाबाद 14 आणि सोलापूर मतदारसंघात 13 उमेदवार निवडणूक लढवित आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 10 टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी आणि भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, संबंधित मतदार संघांचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक हे लाइव्ह वेबकास्ट पाहतील.
दुसऱ्या टप्प्यात मतदान होणारे मतदार संघ
बुलढाणा- 1979 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 59 हजार) अकोला - 2085 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 61 हजार) अमरावती - 2000 मतदान केंद्र, (एकूण मतदार 18 लाख 30 हजार) हिंगोली- 1997 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 32 हजार) नांदेड - 2028 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 18 हजार) परभणी - 2174 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 84 हजार) बीड - 2325 मतदान केंद्र (एकूण मतदार 20 लाख 41 हजार) उस्मानाबाद - 2127 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 86 हजार) लातूर - 2075 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 83 हजार) सोलापूर - 1926 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 50 हजार)