(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lok Sabha Election 2024 : भाजप कोकणात लागलं तयारीला! शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या सभेचा अर्थ काय?
25 वर्षे शिवसेना-भाजप युती राहिली. पण, कोकणात भाजप अपेक्षित अशी वाढली नाही. सध्या देखील कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे यांच्या रूपानं असलेला आमदार वगळता भाजपला मोठं यश मिळालेलं दिसत नाही.
Lok Sabha Election 2024 : कोकण! शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेच्या स्थापनेनंतर कोकणातून शिवसेनेला मिळालेली साथ काही नवीन नाही. अगदी शिवसेनेत असलेले बडे नेते देखील मुळचे कोकणातील. दरम्यान, शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात इतर कोणत्याही पक्षाला म्हणावं तसं यश कधी मिळालं नाही. 25 वर्षे शिवसेना - भाजप युती राहिली. पण, कोकणात भाजप अपेक्षित अशी वाढली नाही. सध्या देखील कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे यांच्या रूपानं असलेला भाजपचा आमदार वगळता भाजपला मोठं यश मिळालेलं दिसत नाही. त्यामुळे आता भाजपनं कोकणात लक्ष केंद्रीत करायला सुरूवात केली आहे. शिवसेनेत मोठं बंड झालं. पण, एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोकणातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गेले असं म्हणता येणार नाही. सध्या शिवसेनेत झालेल्या दुहीचा फायदा उठवण्याचा भाजपकडून प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचाच एक अंक म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची होणारी राजापूर येथील सभा. सोमवारी ( 26 जून ) दुपारी 3 वाजता ही सभा होईल. यावेळी भाजपचे आशिष शेलार, प्रविण दरेकर, रविंद्र चव्हाण यांच्यासह कोकणातील काही प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. मोदी @9 हे या सभेचं निमित्त असलं तरी आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप तयारी करत असल्यची चर्चा आहे. त्यामुळे रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघासाठी भाजप तयारी करत असल्याची चर्चा देखील सध्या सुरू आहे. आशिष शेलार यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी कोकणात आल्यानंतर रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात कमळ फुलणार अशी विधानं देखील केली आहेत. त्यामुळे राजापूर येथील सभेला विशेष महत्त्व आहे.
सभेच्या निमित्तानं उपस्थित होणारे प्रश्न?
नारायण राणेंच्या या सभेच्या निमित्तानं इतर प्रमुख नेते यांच्या उपस्थित राहणार आहेत, याचा नेमका अर्थ काय? आंगणेवाडीमध्ये भाजपने सभा घेऊन कोकणी माणसाला साद घातली. त्यामुळे कोकण पट्ट्यातील कोकणी मतदारांना साद घालत असताना पालिका निवडणूकीवर देखील भाजप कोकणातील मतदारांना जवळ करून पाहत आहे का? कारण आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कोकणाने शिवसेनेला साथ दिली. एका शिंदे यांच्यासोबत कोकणातल्या शिवसैनिक मोठ्या प्रमाणात केले नाहीत. पण शिवसेनेत निर्माण झालेल्या दुहिचा फायदा घेऊन भाजप शिवसेनेच्याच बालेकिल्ल्यात बळकटी धरून पाहत आहे का? भाजप कोकणात ज्या पद्धतीने सध्या काम करत आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची राजकीय दृष्ट्या रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात गोची होत आहे का? किंवा भाजपच्या या खेळीमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची राजकीय दृष्ट्या अडचण वाढणार आहे का? रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदार संघात भाजपचा उमेदवार स्वीकारणे किंवा पर्याय म्हणून शिवसेनेतील उमेदवाराला कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला लागू शकते का? भाजपची सध्याची कोकणातली वाटचाल पाहता केवळ लोकसभा किंवा विधानसभाच नाही तर, स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी काळातील राजकीय गणित कशी असू शकतात? कोकणात भाजप विरुद्ध शिवसेना ( एकनाथ शिंदे ) हा संघर्ष टिपेला जाऊ शकतो का? नारायण राणे, रवींद्र चव्हाण, प्रमोद जठार यांच्यापैकी कोणी एक चेहरा भाजपचा संभाव्य उमेदवार असू शकतो का? भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या राजकारणाचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काय फायदा होऊ शकतो का? यासारखे प्रश्न उपस्थित होतात.
अभ्यासक काय म्हणतात?
वरिल प्रश्नांना किंवा मुद्द्यांना हात घालत रत्नागिरी - सिंधुदुर्ग या मतदारसंघातील निवडणूक जवळून पाहणाऱ्या वरिष्ठ पत्रकारांना एबीपी माझानं काही प्रश्न विचारले. त्यावर बोलताना ''मोदी @9 हे निमित्त आहे. राजापूर येथे होणारी सभा भाजप लोकसभेसाठी तयारी करत आहे असाच होतो. शिवसेनेसाठी हा एक इशारा नक्कीच होऊ शकतो. शिवाय रिफायनरीचा मुद्दा आहेच. केंद्र सरकार याबाबत सकारात्मक आहे. नारायण राणे यांनी उद्योगमंत्री असताना जैतापूरच्या प्रकल्पामध्ये सरकार आणि लोकांमध्ये यशस्वी मध्यस्थी केलेली आहे. त्यामुळे मोदी @9 सभेवेळी राणे रिफायनरीबाबत देखील भूमिका घेऊ शकतात. शिवाय, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं या सभेला महत्त्व आहे. हे नाकारता येऊ शकत नाही. मुख्यबाब म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या राजकारणाचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काय फायदा होऊ शकतो का? या प्रश्नाचं उत्तर तो फायदा भाजपला होईल असं म्हणता येईल. अशी प्रतिक्रिया प्रमोद कोनकर यांनी दिली.
तर, आगामी लोकसभेसाठी भाजपची तयारी सुरू आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्यासह इतर प्रमुख नेते राजापूर इथं येत आहेत अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पत्रकार किशोर मोरे यांनी 'एबीपी माझा'कडे दिली.
मागच्या तीन निवडणुकांचा निकाल काय आहे?
बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते यासारख्या लोकप्रतिनिधींचा हा मतदारसंघ. राजापूर लोकसभा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख होती. पण, हाच मतदारसंघ रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. 2009 पासून लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहता 2009 साली शिवसेनेच्या सुरेश प्रभु यांचा पराभव करत काँग्रेसचे निलेश राणे खासदार झाले.पण, 2014 साली त्यांना शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी पराभव केला.2019 मध्ये देखील विनायक राऊत विजयी झाले. दरम्यान 2024 साली होणारी निवडणूक सध्या रंगतदार आहे. त्यात भाजप तयारी करत असल्यानं शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात बंडानंतर कोण बाजी मारणार? याबाबत आतापासून चर्चा सुरू झाली आहे.
संभाव्य उमेदवार कोण?
सध्याच्या घडीला विचार करता भाजपकडून प्रमोद जठार, रविंद्र चव्हाण तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांची नावं चर्चेत आहेत.तर विनायक राऊत यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेवादवारी निश्चित मानली जात आहे.