Karnataka Election : सीमावर्ती भागात 1.54 कोटींची बेहिशोबी रक्कम जप्त; निवडणुकीसाठी पैसा वापरण्यात येण्याचा संशय
Belgaum Election: एका कारमधून ही रक्कम आणण्यात येत असल्याची माहिती रामदुर्ग पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
बेळगाव : निवडणुकीमुळे कर्नाटकमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना सीमावर्ती भागातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रामदुर्ग पोलिसांनी बेहिशोबी एक कोटी 54 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आहे. ही रक्कम निवडणुकीसाठी वापरण्यात येणार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी या रक्कमेची माहिती आयकर विभागाला दिली आहे.
कर्नाटकात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने सीमावर्ती भागात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. यातच एका कारमधून कोट्यवधी रक्कम नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिासांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आणि संबंधित कार ताब्यात घेतली. या कारमध्ये एक कोटी 54 लाख रुपये बेहिशोबी सापडल्याची माहिती आहे. या कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.
का कारमधून पोलिसांनी एक कोटी 54 लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. या रक्कमेच्या बाबतीत कोणतीही कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी रक्कम ताब्यात घेऊन त्याची मोजदाद केली. या प्रकरणी कारमधील व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या एक कोटी 54 लाख रुपये रक्कमेच्या बाबतीत पोलिसांनी आयकर खात्याला कळवले आहे.
सध्या कर्नाटकात निवडणूक होणार असून बेळगाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पोलिसांनी ठिकठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. सीमावर्ती भागातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
कोल्हापूर-बेळगाव सीमेवर कडक बंदोबस्त
कर्नाटकातील निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता कर्नाटक पोलिसांनी सीमाभागात मोठा बंदोबस्त ठेवला आहे. महाराष्ट्राला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. यामध्ये कोल्हापुरातून बेळगावकडे येणाऱ्या हायवे आणि इतर ठिकाणी पोलिसांनी जागता पहारा ठेवल्याचं चित्र आहे. यामध्ये प्रत्येक खासगी वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. बेळगाव जिल्ह्यात निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि गोव्यातून संभाव्य पैसा आणि इतर अवैध गोष्टींची ने-आण होणार असल्याची पोलिसांना माहिती आहे.
10 मे रोजी मतदान
कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी येत्या 10 मे रोजी निवडणूक होत आहे. तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकात सध्या भाजपचे सरकार असून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात येत आहे. तर काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी कंबर कसली असून प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र आहे.
ही बातमी वाचा: