Nitesh Rane : सरकार आणण्यात हिंदूंचा हात, दुसऱ्या धर्मियांनी मतदान केलं नाही: नितेश राणे
Nitesh Rane Speech : राज्यात आजूबाजूला लव्ह जिहादच्या घटना घडत असताना हिंदू म्हणून आपण एकत्र येणं किती गरजेचं आहे याची जाणीव होते असं राज्याचे मंत्री नितेश राणे म्हणाले.

रत्नागिरी : राज्यातील महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हात आहे, अन्य धर्मियांनी मतदान केलं नाही असं वक्तव्य राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं. मोहल्लात फिरलात पण तुम्हाला त्यांचे मतदान झाले नाही असंही ते म्हणाले. हिंदू समाजानेच आम्हाला सत्तेत बसवलं, त्यामुळे हिंदू समाजाची सेवा करणे, त्यांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे असं नितेश राणे म्हणाले. रत्नागिरीतील चिपळूणमधील रक्षाबंधनानिमित्त राखी संकलनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
अवतीभवती पाहत असताना लव्ह जिहाद सारखे प्रकरणे दिसतात तेव्हा हिंदुत्ववादी सरकार का असावं यांची जाणीव होते. विकास होत राहील पण आपण आपल्या राज्यात महिलांना सुरक्षित ठेऊ शकत नसेल तर काय उपयोग? असा प्रश्न मंत्री नितेश राणे यांनी विचारला.
येत्या काळात हिंदुत्व भक्कम
राज्यात जिहादच्या निमित्ताने वाकड्या नजरेने आपल्या माता-भगिणींकडे पाहिलं जातं. त्याला राखी संकलन हे उत्तरआहे असं नितेश राणे म्हणाले. आज 14 हजार राख्या जमा केल्या, त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवल्या. त्याचा परिणाम येत्या काळात आपल्याला दिसून येणार आहे. त्या निमित्ताने हिंदुत्व भक्कम होणार असल्याचं नितेश राणे म्हणाले.
लव्ह जिहादला एकत्र येऊन उत्तर द्या
मंत्री नितेश राणे म्हणाले की, "लव्ह जिहाद सारखी प्रकरणे गावागावात होत आहेत. रत्नागिरीत असे अनेक प्रकरणे होत आहेत. याला एकच सक्षम उत्तर आहे की आपण हिंदू म्हणून खांद्याला खांदा लावून काम करायला पाहिजे. आमच्या आया बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याला जाग्यावर ठेवणार नाही ही भावना प्रत्येकाची असायला पाहिजे."
राज्यात हिंदूंचे भक्कम सरकार
हिंदू धर्माच्या दृष्टीने हिंदू म्हणून आपलं काम भक्कम आहे असं नितेश राणे म्हणाले. ते म्हणाले की, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जे काम करत आहेत, किंवा राज्याचे गृहमंत्री म्हणून काम करत असताना आपला एक भाऊ ही जबाबदारी पार पाडतो आहे ही राज्यातील महिलांची भावना आहे. मुख्यमंत्री झाल्यावर जे निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतले यातून राज्यात कोणीही आमच्या महिला भगिनीकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, लव्ह जिहाद सारखे विषय करू शकत नाही ही भावना प्रत्येक बहिणीच्या मनात आहे."
सरकार आणणे हे कार्यकर्त्याचं काम आहे. त्यामुळे सरकारची काही कामं आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. आमची जी काही पदं आहेत ती कार्यकर्त्यांमुळे आहेत, तुम्हाला ताकद देण्यासाठी आहेत असं नितेश राणे म्हणाले.























