(Source: Poll of Polls)
Lok Sabha Election 2024 : कल्याण लोकसभेची जागा लढायची आणि जिंकायचीच; स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे आदेश
Lok Sabha Election 2024 Updates: "कल्याण लोकसभेची जागा आपण लढवायची आणि कोणत्याही परिस्थितीत जिंकायची," असा आदेश उद्धव ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचा (Kalyan Lok Sabha Constituency) आढावा घेतला. "ही लोकसभेची जागा आपण लढवायची आणि कोणत्याही परिस्थितीत जिंकायची," असा आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला आहे.
'कधीही निवडणूक लागेल, तयारी करा'
उद्धव ठाकरे यांनी आज कल्याणमधील ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. केंद्र सरकारने तातडीचं अधिवेशन बोलवलं आहे. त्यामुळे लवकरच निवडणुका लागू शकतात त्या दृष्टीने आपली तयारी असायला हवी, अशी सूचना त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ते म्हणाले की, आपण कल्याण लोकसभा मतदारसंघ 1996 साली भाजपकडून भांडून घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा लोकसभेची ही जागा आता आपण लढवायची आणि कुठल्याही परिस्थितीत जिंकायची."
'तळागाळापर्यंत पोहोचून प्रचार करा'
"समोरच्याची ताकद कितीही असू द्या, कुठलाही उमेदवार समोर देऊ द्या, तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून प्रचार करा. स्थानिक पदाधिकाऱ्यांना भेटून आपली संघटना आणखी मजबूत करा," असे आदेशही उद्धव ठाकरेंनी बैठकीत नेत्यांना दिले आहेत.
इंडिया आघाडीच्या बैठकीचं यजमानपद आपल्याकडे होतं. त्यामुळे इंडिया आघाडीत असताना मला काही ठिकाणी दौरे करावे लागतील. माझं आपल्या मतदारसंघात येणं-जाणं कमी होईल तरीदेखील तुम्ही जोमाने तयारी करा, असं उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीत आपल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना म्हटलं.
कल्याण मतदारसंघासाठी भाजप प्रयत्नशील
दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. हा मतदारसंघ सुरुवातीपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. एकनाथ शिंदे यांनी 2014 साली श्रीकांत शिंदे यांना या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्यावेळी जबरदस्त मोदी लाट असल्याने श्रीकांत शिंदे सहज निवडून आले. त्यानंतर 2019 सालीही हा मतदारसंघ शिवसेनेच्याच वाट्याला गेला. दुसऱ्या वेळीही श्रीकांत शिंदे निवडून आले. कल्याण डोंबिवली हा आपल्या हक्काचा मतदारसंघ असून हा भाजपलाच मिळावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. राज्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपची सत्ता येताच भाजपने कल्याण लोकसभा मतदारसंघ काबीज करुन श्रीकांत शिंदे यांना ठाण्यात पाठवण्याची तयारी सुरु केल्याची चर्चा आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे हे ठाकरे गटासोबत असल्याने त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांनी निवडणूक लढवावी आणि कल्याण डोंबिवली भाजपला द्यावे असा एक मतप्रवाह आहे.
VIDEO : Uddhav Thackeray : काहीही करुन कल्याणची जागा जिंकायची, उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश