Congress : वसंतदादांच्या घराण्याला डावलण्याचं काम काही मंडळींकडून सुरु, जयश्रीताई पाटील यांची निलंबनाच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया
Jayashreetai Patil : काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर अपक्ष उमेदवार जयश्रीताई पाटील यांनी वसंतदादा घराण्याला डावलण्याचं काम काही मंडळींकडून सुरु असल्याचं म्हटलं.
सांगली : काँग्रेस पक्षाकडून पक्षादेश डावलून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कायम ठेवणाऱ्यांवर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जयश्रीताई पाटील यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कारवाईवर जयश्रीताई पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून वसंतदादा पाटील यांच्या घराण्याला डावलण्याचं काम पक्षातील काही मंडळींनी केल्याचं त्यांनी म्हटलं. निलंबनाची कारवाई झाली असली तरी महाविकास आघाडीची उमेदवार असल्याचं जयश्रीताई पाटील म्हणाल्या. महिला उमेदवार म्हणून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं त्या म्हणाल्या.
जयश्रीताई पाटील यांनी काय म्हटलं?
वसंतदादा पाटील यांच्या घराण्याने काँग्रेससाठी मोठे योगदान दिले आहे. पक्षानेही आम्हाला पदे दिली आहे. मी पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहिले. पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक काम केले. पण गेल्या काही वर्षात वसंतदादा घराण्याला डावण्याचे काम पक्षातील काही मंडळींनी केले, असं जयश्रीताई पाटील म्हणाल्या.
जयश्रीताई पाटील पुढं म्हणाल्या, यंदाही मी मेरिटवर पक्षाची उमेदवारी मागितली होती. पण ऐनवेळी षडयंत्र करून माझी उमेदवारी डावलली गेली. महाविकासआघाडीचे घटक असलेले खासदार विशाल पाटील यांनी माजी उमेदवारी महाविकास आघाडीचीच असल्याचे जाहीर केली आहे. त्यामुळे मी महाविकास आघाडीचीच अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवत आहे. एक महिला उमेदवार म्हणून मला पाठिंबाही मिळत आहे, असंही जयश्रीताई मदन पाटील यांनी म्हटलं. मदन पाटील हे ज्यावेळी अपक्ष म्हणून निवडून आले होते त्यावेळी देखील त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं.
सांगली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील यांनी उमेदवारी मागितली होती. काँग्रेसनं पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर जयश्रीताई पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.याशिवाय खासदार विशाल पाटील यांनी देखील त्यांना पाठिंबा जाहीर केला. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसनं एकाही महिलेला उमेदवारी दिलेली नाही, त्यामुळं पक्षाकडे सांगलीतून उमेदवारी मागितल्याचं जयश्रीताई पाटील यांनी सांगितलं.
सांगलीत तिरंगी लढत
सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपनं पुन्हा एकदा सुधीर गाडगीळ यांना उमेेदवारी दिलेली आहे. काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील पुन्हा निवडणूक लढवत आहेत. जयश्रीताई पाटील अपक्ष निवडणूक लढवत असल्यानं या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
2014 नंतर आमच्या कुटुंबाला एकदाही काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. काय नेमकी चूक या वसंतदादा घराण्याने केली आहे. काँग्रेस पक्षाकडून हे अजून आम्हाला कळालं नाही. तरीही निष्ठा आम्ही सोडली नाही. सातत्याने आमच्या कुटुंबावर अन्याय होत गेला, असं विशाल पाटील म्हणाले होते.
इतर बातम्या :
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार