एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हिंगणा विधानसभा मतदारसंघ : भाजप विजयाची हॅटट्रिक साधणार का?
हिंगणा हा नागपूर शहराच्या अगदी जवळचा मतदारसंघ. नागपुरातल्या रामटेक या लोकसभा मतदारसंघांतर्गत येणारा हा मतदारसंघ तसा औद्योगिक वसाहतींचा आणि ग्रामीण भाग तसंच कामगार वस्त्यांचा आहे. मागील दोन्ही निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला आहे. आता भाजप विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज आहे.
2019 च्या निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातील ज्या विधानसभा क्षेत्रातून युतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य मिळालं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेलं 'फेटरी' गाव ज्या विधानसभा मतदारसंघात येतं, तो मतदारसंघ म्हणजे म्हणजे हिंगणा विधानसभा मतदारसंघ. विधानसभा मतदारसंघांच्या फेररचनेनंतर अस्तित्वात आलेल्या हिंगणा मतदारसंघात गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे यंदा भाजपला विजयाची हॅट्रिक साधण्याची संधी आहे. तर आघाडीत राष्ट्रवादीच्या कोट्यातल्या या मतदारसंघात पुन्हा कमबॅक करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसुबे आहेत. स्थानिक काँग्रेस नेते मात्र आघाडीच्या जागा वाटपात हे मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्यासाठी इच्छुक आहेत.
काय आहे मतदारसंघाचा राजकीय इतिहास
हिंगणा विधानसभा मतदारसंघ हा 2009 मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत अस्तित्वात आला. जुन्या कळमेश्वर मतदारसंघातून नागपूरच्या सीमेवर वसलेलं हिंगणा हे औद्योगिक क्षेत्र. नीलडोह, डिगडोह, वानाडोंगरी सारख्या कामगारांच्या वस्त्या, वाडी, दत्तवाडी आणि पंचतारांकित एमआयडीसीचा दर्जा असलेली बुटीबोरी औद्योगिक वसाहत या शहरी परिसरासह काही प्रमाणात ग्रामीण भाग मिळून संमिश्र स्वरूपाचं हिंगणा विधानसभा मतदारसंघ तयार झाला. त्यानंतर झालेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत हिंगण्यातून भाजपचे आमदार निव़ून आले. यापूर्वी जुन्या कळमेश्वर मतदारसंघावर राष्ट्रवादीचा कब्जा होता. 2009 च्या पूर्वी इथे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश बंग यांचा प्रभाव होता. मात्र, 2009 च्या निवडणुकीत भाजपच्या विजय घोडमारे यांनी त्यांचा अवघ्या 700 मतांनी पराभव करत पहिल्यांदाच हिंगण्यामध्ये कमळ फुलवलं. त्यानंतर 2014 मध्ये भाजपने तत्कालीन आमदार विजय घोडमारे यांना विश्रांती देत नव्याने भाजपवासी झालेल्या आणि जिल्ह्यातील राजकारणात प्रभाव असलेल्या मेघे कुटुंबातील समीर मेघे यांना संधी दिली. त्या निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत समीर मेघे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते रमेश बंग यांचा तब्बल 23 हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर हिंगणा विधानसभा मतदारसंघांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जवळपास सर्वच निवडणुकांमध्ये भाजपने यश मिळवलं. त्यामुळे मतदारसंघात समीर मेघे यांचा चांगलाच प्रभाव निर्माण झाला आहे.
काय आहेत हिंगण्यातील जातीय, भाषिक, सामाजिक आणि आर्थिक समीकरणे
हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये समप्रमाणात शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश आहे. हिंगणा आणि बुटीबोरी या नागपूर जवळच्या दोन महत्वाच्या औद्योगिक वसाहती मतदारसंघात येत असल्याने इथे कामगारांच्या वस्त्या मोठ्या प्रमाणात आहेत. यात मराठी आणि हिंदी भाषिक कामगार समप्रमाणात असल्याने, भाषिक दृष्ट्या हा मतदारसंघ संमिश्र स्वरूपाचा आहे. मतदारसंघाचा एक भाग ग्रामीण असल्याने शेतकरी आणि शेतमजुरांची संख्या ही लक्षणीय आहे. तसंच नागपूरच्या अनेक जुन्या जाणत्या नेत्यांच्या शैक्षणिक संस्था (किंबहुना शैक्षणिक साम्राज्य) हिंगणा मतदारसंघात असल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि त्या संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाची लक्षणीय संख्या या मतदारसंघात आहे.
जातीय समीकरणांचा विचार केल्यास हिंगणा मतदारसंघात कुणबी मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर तेली समाजाचे मतदार आहेत. नवबौद्ध (अनुसूचित जाती) मतदारांची संख्या ही तेवढीच लक्षणीय आहे.
इच्छुकांची गर्दी
हिंगणा मतदारसंघात भाजपमध्ये इच्छुकांची फारशी गर्दी दिसत नाही. पाच वर्षाच्या कारकिर्दीत 'युवा आणि सक्रिय आमदार' अशी प्रतिमा निर्माण करणारे समीर मेघे विद्यमान आमदार असल्याने आणि ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोघांच्या 'गुडबुक्स'मध्ये असल्याने उमेदवारीसाठी त्यांचा दावा जवळपास निर्विवाद आहे. 2014 मध्ये घरी बसवले गेलेले विजय घोडमारेसुद्धा गेल्या काही वर्षात सक्रिय नसल्याने भाजपमध्ये उमेदवारीबद्दल फारशी चर्चा नाही. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रमेश बंग हे गेल्या दोन निवडणुकांमधील पराभवाची धूळ झटकून नव्या उमेदीने तिकीट मिळवण्याच्या शर्यतीत आहेत. मात्र, नव्या चेहऱ्याचा विचार झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय सेलचे संतोष नरवाळे यांचा ही विचार होऊ शकतो. जर आघाडीच्या जागा वाटपात ऐनवेळी हिंगण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी काँग्रेसच्या वाट्याला आली तर पक्षात उमेदवारीवरुन चांगलीच चुरस दिसेल. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या कुंदा राऊत, प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि मुकुल वासनिक यांचे विश्वासू मुजीब पठाण, अनेक वर्षांपूर्वी शिवसेना सोडून काँग्रेसवासी झालेले बाबा आष्टनकर ह्या सर्वानी उमेदवारीची इच्छा पक्षाकडे दर्शविली आहे.
दरम्यान एका संभाव्य उलटफेराची चर्चा सध्या हिंगणा मतदारसंघात जोरात सुरु आहे. हिंगण्याची जागा जर काँग्रेसच्या वाट्याला आली तर भाजपच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवणारे आशिष देशमुख हिंगण्यातून काँग्रेसची उमेदवारी मिळवू शकतात. मात्र, सध्या तरी ही फक्त चर्चाच आहे. दरम्यान हिंगणा मतदारसंघात बसपाला मिळणारी मते नेहमीच लक्षवेधी राहिली आहेत. त्यामुळे बसपाची उमेदवारी कोणाला मिळते आणि नव्याने निर्माण झालेल्या वंचित बहुजन आघाडीचा किती प्रभाव पडतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
गेल्या काही निवडणुकांचे मतदान काय सांगते
हिंगणा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतरच्या दोन विधानसभा निवडणुकांच्या मतदानावर नजर टाकली तर इथे दोन्ही वेळेला भाजप विजयी झालं आहे. मात्र, 2009 मध्ये भाजपने इथे फक्त 700 मतांनी निसटता विजय मिळवला होता. तेव्हा बसपाने 9 हजार पेक्षा जास्त मते घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवात महत्वाची भूमिका बजावली होती. 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपला 23 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. मात्र, तेव्हा देखील काँग्रेसला 20 हजार आणि बसपाला 19 हजार पेक्षा जास्त मते मिळाल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली होती...
2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र महायुतीच्या उमेदवाराने म्हणजेच शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांनी हिंगणा विधानसभा मतदारसंघातून 25 हजार 919 मतांची आघाडी घेतली होती. विशेष म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीला हिंगण्यातून मिळालेलं मताधिक्य हे सर्वाधिक होतं. त्यामुळे लोकसभेत मिळालेले सुमारे 26 हजारांचे मताधिक्य भाजपचा उत्साह वाढवणारं आहे.
मतदारसंघात महत्वाचे मुद्दे
हिंगणा मतदारसंघात सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे मतदारसंघात दोन मोठ्या औद्योगिक वसाहती असूनही परिसराचा अपेक्षित विकास झालेला नाही. हिंगणा औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करेल असा एकही मोठा उद्योग नव्याने आलेला नाही आणि बुटीबोरी या औद्योगिक वसाहतीमध्ये तर अनेक भूखंड रिकामे पडलेले आहेत. त्यामुळे मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न महत्वाचा ठरतो. शिवाय जे उद्योग या औद्योगिक वसाहतीत सुरु आहेत त्यात भूमिपुत्र आणि बाहेरून येऊन स्थायिक झालेले मजूर असा वाद कायम आहे. हिंगणा मतदारसंघाच्या परिसरात अनेक नेत्यांच्या मोठमोठ्या शिक्षण संस्था असल्याने उच्च शिक्षित तरुणांची रेलचेल या परिसरात दिसून येते, मात्र त्यांच्या शिक्षणानंतर त्यांना सामावून घेऊ शकणारे दर्जेदार उद्योग व्यवसाय इथे नसल्याने विकासाचा असमतोल स्पष्ट जाणवतो. तसंच पट्टे वाटपाचा प्रलंबित असलेला प्रश्न, ग्रामीण विकासाच्या आड येणारा झुडपी जंगलाचा प्रश्न, वेणा नदीकाठच्या गावांना पुरापासून संरक्षण देण्याची मागणी, इसासनी-बोखारा-गोधनी या निमशहरी भागात आजही किमान नागरी सोयींचा अभाव असे अनेक प्रश्न मतदारसंघात कायम आहेत. येत्या निवडणुकीत या समस्या आणि प्रश्न राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरू शकतात.
दुसऱ्या बाजूला आमदार समीर मेघे यांनी कामगारांसाठी ईएसआयसी रुग्णालय मंजूर केल्याचा दावा केला आहे. शिवाय अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तुरागोंदी आणि लखमापूर सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचा ही त्यांचा दावा आहे. निलडोह-डिगडोहसाठी पाणी पुरवठा योजना, किनालमाकडी - पीपलधरा पुनर्वसन योजना मार्गी लावल्याचंही ते सांगतात. मात्र, त्यांचे विरोधक ही कामे सध्या तरी फक्त कागदावरच असल्याचा आरोप करतात. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर येत्या विधानसभा निवडणुकीत जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतील.
एकंदरीत काय तर समीर मेघे यांच्या स्वरूपात या मतदारसंघात भाजपकडे युवा आणि पक्षातील सर्व घटकांना सोबत नेणारा उमेदवार आहे. शिवाय मतदारसंघात अनेक वर्षांपासून शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून मेघे कुटुंबीयांचा जनसंपर्क आणि जनाधार त्यांच्या पाठीशी आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस किंवा संधी मिळाल्यास काँग्रेस या मतदारसंघात त्यांच्या पक्षासाठी पुन्हा अच्छे दिन आणण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा खेळ मतांच्या विभाजनावर अवलंबून राहणार आहे. खास करून बौद्ध मतदारांना पारंपरिक स्वरूपात आकर्षित करणाऱ्या बसपा आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किती मते घेतात यावर सुद्धा उमेदवाराचे गणित अवलंबून राहणार आहे.
विदर्भातील आणखी काही विधानसभा मतदारसंघाची ओळख आणि विश्लेषण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement