(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Haryana Election Results 2024: हरियाणात 50 जागांवर भाजपची आघाडी, 4 महिने, 16 हजार सभा; RSSने संपूर्ण राजकीय खेळी बदलली?
Haryana Vidhan Sabha Election Result 2024: हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. मात्र या विजयात आरएसएसची भूमिका महत्वाची मनाली जात आहे.
Haryana Election Results 2024: हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana Vidhan Sabha Election Result) एक्झिट पोल्स आणि राजकीय पंडितांचे अंदाज चुकवत भाजप (BJP) पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. हरियाणात आजपर्यंत विधानसभेच्या दोन टर्मनंतर कोणत्याही पक्षाचे सरकार तिसऱ्यांदा निवडून आलेले नाही. मात्र, मतमोजणीचे सध्याचे कल पाहता भाजप हरियाणात (Haryana Elections Results 2024) तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची किमया साधू शकतोय. शेतकरी आंदोलन आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे देशव्यापी नाचक्की झाल्यामुळे हरियाणातील परिस्थिती भाजपसाठी (BJP) प्रतिकूल मानली जात होती. मात्र, ही सगळी आव्हाने झुगारत भाजप सध्या दमदारपणे सत्तेच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.
4 महिने, 16 हजार सभा,आरएसएसची महत्वाची भूमिका
हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज म्हणजेच 8 ऑक्टोबरला संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. याआधी, आत्तापर्यंतच्या ट्रेंडनुसार भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होताना दिसत आहे.ट्रेंडनुसार भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. लोकसभा निवडणुकीत हरियाणात भाजपला चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे ही विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी चुरशीची ठरली. दरम्यान, यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हरियाणा विधानसभा निवडणुकीत आपली पूर्ण ताकद लावली असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे भाजपचे दिग्गज नेते रॅलीत दिसत होते, तर दुसरीकडे आरएसएस तळागाळात काम करत होती. त्यामुळे या निवडणुकीत आरएसएसची भूमिका महत्वाची मनाली जात आहे.
गैर-जाट मतदारांना जिंकण्यातही यश
भाजपचा हरियाणातील सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये वाढताना दिसत असताना त्यामागे आरएसएसची मेहनत असल्याचे बोलले जात आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत आरएसएसने आपली पूर्ण ताकद लावली होती. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे सर्व दिग्गज रॅली काढून जनतेला संबोधित करत असताना, दुसरीकडे आरएसएस तळागाळात काम करत मतदारांना आपल्याकडे वळवले आहे. गेल्या चार महिन्यांत आरएसएसने हरियाणात 16 हजार छोट्या सभा घेतल्या. विशेष म्हणजे यात त्यांनी गैर-जाट मतदारांना जिंकण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली.
मात्र, त्याचवेळी दुसऱ्या बाजूला अनुकूल परिस्थिती असताना काँग्रेसला आलेले अपयश चर्चेचा विषय ठरणार आहे. हरियाणातील अपयशामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. हरियाणातील काँग्रेसचा पक्षातंर्गत संघर्ष पराभवासाठी कारण ठरला का, हे आता पाहावे लागेल. भाजपला यंदाच्या निवडणुकीत हरियाणात सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी भाजपला हरियाणात इतक्या मोठ्याप्रमाणावर यश मिळाले नव्हते.
हे ही वाचा