Goa Election 2022 : गोव्यात विश्वजीत राणेंना दुसऱ्या क्रमांकाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता
गोव्यात विश्वजीत राणे यांना दुसऱ्या क्रमांकाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. विश्वजीत राणे मागील तीन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत.
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटले तरी अद्याप सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. तसेच अद्याप विधीमंडळातील नेत्याची निवड देखील केलेली नाही. अशातच विश्वजीत राणे यांना दुसऱ्या क्रमांकाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. याआधी भाजपचे वाळपई मतदारसंघातील आमदार विश्वजीत राणे नाराज असून मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी प्रयत्न केल्याची चर्चा देखील गोव्यात रंगली होती.
दरम्यान, विधीमंडळाचा नेता आणि मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा एकदा डॉ. प्रमोद सांवत यांच्या खांद्यावर राहणार असून विश्वजीत राणे यांना दुसऱ्या क्रमांकाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. मुख्य बाब म्हणजे राणे मागील तीन दिवसांपासून दिल्लीतच तळ ठोकून आहेत. दुपारी चार वाजता भाजप विधीमंडळ नेत्याची निवड करेल. त्यानंतर राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा करत शपथविधीची तारीख देखील ठरवली जाणार आहे.
राणे आणि सावंत यांच्यातील संघर्ष
मुळात विश्वजित राणे आणि प्रमोद सावंत यांच्यातील संघर्ष याआधी देखील गोव्यातील नागरिकांनी पाहिला आहे. कोरोना काळात आरोग्यमंत्री असलेल्या विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर कोरोना स्थिती नीट हाताळले नसल्याचे गंभीर आरोप केले होते. मात्र त्यावेळी प्रमोद सावंत यांनी जोरदार प्रतिकार केला होता. 2017 मध्ये काँग्रेसमधून आमदार झालेले विश्वजीत राणे यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान, दोनापावला येथील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडिअमवर शपथविधी सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहू शकतात अशी चर्चा देखील आता सुरु आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल
गोवा - एकूण जागा 40
भाजप - 20
काँग्रेस - 11
आम आदमी पक्ष - 2
गोवा फॉरवर्ड पक्ष- 1
अपक्ष - 3
मगोप - 2
रिवोल्यूशनरी गोअन्स पक्ष - 1