शिवापूर टोलनाक्यावर 5 कोटींचं घबाड सापडलं, पोलिसांच्या तोंडाला कुलूप; शहाजीबापू पाटलांची पहिली प्रतिक्रिया
Five Crore Cash Siezed From Car: शिवापूर टोलनाक्यावर 5 कोटी रुपयांची रक्कम सापडल्यानंतर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Shahajibapu Patil On Five Crore Cash Siezed From Car: खेड-शिवापूर टोलनाक्यावर काल (सोमवारी) रात्री एका वाहनातून 5 कोटी रुपयांची रक्कम हस्तगत केली. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. मात्र याप्रकरणी पोलीस अधिकारी, प्रांतअधिकारी, निवडणूक अधिकारी कोणतीच माहिती देण्यास तयार नाही.
पोलिसांना ज्या गाडीत 5 कोटी रुपयांची रक्कम सापडली, ती गाडी सांगोल्यातील अमोल नलावडे याच्या नावावर असल्याची माहिती समोर आली. अमोल नलावडे हा एका मोठ्या नेत्याच्या जवळचा असल्याचा दावाही काही जणांनी केला. याचदरम्यान ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर आरोप केला होता. मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले. हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले 15 कोटीचा हा पहिला हप्ता...काय बापू.. किती हे खोके?, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं. संजय राऊतांच्या या विधानावर आता शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शहाजीबापू पाटील काय म्हणाले?
तालुक्यात माझे हजारो कार्यकर्ते आहेत. हे कार्यकर्ते वेगवेगळ्या स्थरातील आहेत. शिवापूर टोलनाक्यावर एका गाडीत 5 कोटी रुपयांची रक्कम सापडल्याची बातमी मी टीव्हीवरील बातम्यांमधूनच कळालं. ती गाडी माझी किंवा माझ्या कुटूंबातील कुणाचीही नाही, असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊतांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
शहाजीबापू पाटलांचा संजय राऊतांवर घणाघात-
संजय राऊतांना त्यांची सत्ता गेल्यापासून आणि आम्ही यशस्वी राजकीय उठाव केल्यापासून रात्री झोपताना झाडं दिसतात....सकाळी उठताना डोंगर दिसतात...त्यांची नजर असते. सातत्यानं मला फक्त मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असंही शहाजीबापू पाटील यावेळी म्हणाले.
गाडी कोणाच्या नावावर?
कारवाईची माहिती गुप्त राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाच कोटी रुपयांची रक्कम कुठुन आली होती, कुठे निघाली होती आणि हे पाच कोटी रूपये कोणाचे आहेत?, याची माहिती देण्यास ना पोलीस , न प्रांताधिकारी ना निवडणूक विभागाचे अधिकारी, ना आयकर विभागाचे अधिकारी तयार झाले. दरम्यान ज्या गाडीसह ही रक्कम जप्त करण्यात आली, ती गाडी MH 45 AS 2526 या क्रमांकाची असून ती सांगोल्यातील अमोल नलावडे नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे समोर आले आहे.