(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath shinde : शिंदेंच्या आमदारांची मागणी, साहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हा; त्यावर काम सुरू असल्याचं एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य
Shiv Sena Meeting : विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याचा महायुतीला फायदा झाल्याने त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी शिवसेनेच्या नवनियुक्त आमदारांनी केली.
मुंबई : राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एका सूचक वक्तव्याने मात्र सर्वाचं लक्ष वेधलं आहे. शिवसेना आमदारांच्या बैठकीत शिंदेंनीच मुख्यमंत्री व्हावं अशी आमदारांनी मागणी केली. त्यावर काम सुरू असल्याचं सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं.
शिंदेंच्या चेहऱ्याचा महायुतीला फायदा
मुंबईच्या हॉटेल ताज लँड्समध्ये शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत आले. त्यावेळी शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची सर्वानुमते निवड करण्यात आली. तुम्हीच मुख्यमंत्री व्हा अशी मागणी सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. यावर काम सुरू असल्याचं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री शिंदेंनी केलं. तुमच्या चेहऱ्यामुळे महायुतीला फायदा झाला असून तुम्हीच मुख्यमंत्री व्हा अशी मागणी शिंदेंच्या आमदारांनी केली.
मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 27 किंवा 29 तारखेला?
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 26 तारखेला होणार अशी चर्चा होती. मात्र आता सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडल्याचं समजतंय. यामागे दोन ते तीन महत्त्वाची कारणं आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पूर्ण बहुमताचे सरकार असल्याने कोणतीही घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊनच सरकार स्थापन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होणं गरजेचं आहे. त्यानंतर अमित शाह आणि शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्यात बैठक होईल. त्या बैठकीनंतर या तीनही नेत्यांचा शपथविधी होईल असं कळतंय. त्यामुळे 27 किंवा 29 तारखेला सत्तास्थापन होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता कमी?
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर अर्थातच चर्चा सुरू झाली ती नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार याची. 26 नोव्हेंबरला सध्याच्या विधानसभेची मुदत संपतेय. त्याआधी नव्या सरकारचा शपथविधी होणं बंधनकारक आहे. नाहीतर राष्ट्रपती राजवट लागेल असं बोललं जातंय. मात्र ही धारणा चुकीची असल्याचं अनेक कायदेतज्ज्ञांचं मत आहे. या आधीही अशा घटना घडल्या होत्या आणि त्यावेळी राष्ट्रपती राजवट लागली नव्हती असं समोर आलं आहे.
मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा
नव्या मंत्रिमंडळाचा संभाव्य 21, 12, 10 असा असू शकतो अशी माहिती महायुतीतील्या सूत्रांनी दिली. यात भाजपला सर्वाधिक 21 मंत्रिपदं, त्यानंतर शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. ही प्राथमिक चर्चा असून यात अंतिम क्षणी बदल होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीतले राज्यातले तिन्ही मुख्य नेते आणि दिल्लीतले वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा करून अंमित निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा: