(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde: 'मुंबईत थांबू नका, आपापल्या मतदारसंघात जा अन्...', एकनाथ शिंदेंचे आमदारांना आदेश, दोन दिवसांपासून सर्व गाठीभेटी नाकारल्या
Eknath Shinde: निकालानंतर सर्व आमदारांना मुंबईत बोलवलं होतं, सर्व आमदारांना वांद्र्यातल्या ताज लॅड्स एन्ड मध्ये ठेवण्यात आलं होतं.
मुंबई: विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळालं. मात्र, त्या यशानंतर आता मुख्यमंत्री पदाचा आणि नाराजीनाट्याचा सुर राज्यभरात दिसून येत आहे. अशातच महायुतीच्या यशानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, अशातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात असतानाच एकनाथ शिंदे नाराज झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. यादरम्यान त्यांनी बोलणं आणि भेटणं देखील टाळलं आहे. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या आमदार, खासदार यांच्या भेटी देखील त्यांनी टाळल्या आहेत, त्यांनी भेटी का टाळल्या त्याचबरोबर त्यांनी मौन का बाळगलं आहे, याचं नेमके कारण समजू शकलं नसलं तरीदेखील एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे.
आपआपल्या मतदारसंघात जा, जल्लोष साजरा करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटी टाळल्या असून आमदारांनी मुंबईत थांबू नका, आपआपल्या मतदारसंघात परत जा, जल्लोष साजरा करा, विजयी रॅली काढा, असे आदेश एकनाथ शिंदेंनी आमदारांना दिले आहेत. निकालानंतर सर्व आमदारांना मुंबईत बोलवलं होतं, सर्व आमदारांना वांद्र्यातील ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, दोन दिवसापासून एकनाथ शिंदेंनी सर्व गाठीभेटी नाकारल्या आहेत. सर्व आमदार भेटण्यासाठी जात होते सर्व आमदारांना मतदार संघात जाण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत.
शिवसेनेचे आमदार वांद्रे येथील ताज लँड्स एंडमध्ये
निवडणुकीतील मोठ्या यशानंतर, शिंदे गटातील शिवसेनेचे सर्वच्या सर्व आमदार वांद्रे येथील ताज लँड्स एंड (Taj Lands End) हॉटेलमध्ये राहणार होते. शपथविधीपर्यंत सर्वांना हॉटेलमध्येच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शिवसेनेचे पक्षनेते निवडण्याची प्रक्रियाही हॉटेलमध्येच पार पडणार असल्याची माहिती होती. शिवसेनेनं 54 विधानसभेच्या जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी आमदारांना माघारी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.
आमदार मुंबईत तळ ठोकून
शिवसेनेचे अनेक आमदार मंत्रिपदाच्या लॉबिंगसाठी मुंबईत तळ ठोकून आहेत. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. अशातच पुन्हा मंत्रिपद मिळावं यासाठी माजी मंत्र्यांची शिवसेनेत लॉबिंग सुरु झाली आहे. मंत्रिपदे होती ती पुन्हा मिळवण्यासाठी आमदारांची रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. त्यामुळे अनेक आमदार मुंबईत तळ ठोकून आहेत. शिंदेंना भेटण्यासाठी अनेक आमदार प्रयत्न करत आहेत. अशातच शिंदेंनी भेट नाकारली टाळली असून त्यांना आपापल्या मतदारसंघात परत जाण्याची सूचना केली आहे.