एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसपुढे बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचं आव्हान
धुळे ग्रामीण म्हणजे आधीचा कुसुंबा मतदारसंघ. एकेकाळी मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असलेल्या रोहिदास पाटील यांचा हा मतदारसंघ. काँग्रेसचा बालेकिल्ला. पण परवाच्या लोकसभा निवडणुकीत रोहिदास पाटलांचे चिरंजीव आमदार कुणाल पाटील स्वतः काँग्रेसचे उमेदवार असताना त्यांना त्यांच्याच मतदारसंघात आघाडी घेता आली नाही.
आताचा धुळे ग्रामीण म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वीचा कुसुंबा विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघावर पाच वर्षांचा अपवाद वगळता कायमच काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे. माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा एकछत्री अंमल असलेल्या या मतदारसंघात सध्या त्यांचे पुत्र कुणाल पाटील हे आमदार आहेत. पाणीदार आमदार अशीही त्यांची ओळख आहे . ते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चेने त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत .
2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला या मतदारसंघात मताधिक्य मिळालं. म्हणजे त्यामुळे काँग्रेस आणि रोहिदास पाटील कुटुंबाला धक्का बसला. हा धक्का फक्त लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाचा नव्हता तर स्वतःच्याच मतदारसंघातली पिछाडीचाही होता. मात्र त्यातून सावरत आता काँग्रेसचा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी त्यांनी आत्तापासूनच प्रयत्न सुरु केलेत.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात २००९ मध्ये मतदार संघाची पुनर्रचना झाल्यानंतर शिवसेनेचा झेंडा फडकला. या मतदार संघात एकूण १६० गावांचा समावेश आहे. या मतदार संघात जवळपास ३१ वर्ष काँग्रेसचे रोहिदास पाटील यांची सत्ता होती . मात्र २००९ मध्ये शिवसेनेचे प्राध्यापक शरद पाटील यांनी काँग्रेसचे रोहिदास पाटील यांचा १८ हजार ९८२ मतांचं मताधिक्य घेत पराभव केला.
२००९ मध्ये शरद पाटील यांना १,००,५६२ मत मिळाली तर रोहिदास पाटील यांना ८१,५८० मतं मिळाली. त्यानंतर मात्र २०१४ मध्ये पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात हा मतदार संघ गेला. रोहिदास पाटील यांचे सुपुत्र कुणाल रोहिदास पाटील यांनी शिवसेनेचे शरद पाटील यांचा पराभव केला
अक्कलपाडा धरण याच एका मुद्यावर धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवली गेली, लढवली जात आहे. या मतदार संघाने आघाडी सरकारच्या काळात रोहिदास पाटील यांच्या रूपाने पाटबंधारे मंत्री पद बघितलं. पाटबंधारे मंत्रिपद मिळून देखील अक्कलपाडा धरणाचं काम पूर्ण होऊ शकलं नव्हतं. अजूनही अक्कलपाडा धरणाच्या डाव्या, उजव्या कालव्याचा आणि प्रकल्पबाधितांचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही.
रोहिदास पाटील यांचा जवाहर गट
धुळे ग्रामीण मतदार संघात रोहिदास पाटील यांच्या जवाहर गटाचं वर्चस्व आहे. सूतगिरणी, मेडिकल कॉलेज, शैक्षणिक संस्था, या जवाहर गटाच्याच आहेत. यातील किती सूतगिरणी सुरु आहेत हे सर्वज्ञात आहे.
धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातील काही प्रमुख प्रश्न :-
( १ ) औद्योगिक क्षेत्र विकासाचा अभाव
( २ ) रोजगाराचा प्रश्न
( ३ ) पिण्याचा पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न
( ४ ) बंद पडलेल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न
( ५ ) शेतकरी आत्महत्या प्रश्न
धुळे ग्रामीण मतदार संघावर भाजप आणि शिवसेना या दोघांनी दावा केलाय. तर दुसरीकडे या मतदार संघाचे विद्यमान आमदार कुणाल पाटील हे भाजप अथवा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत, मात्र याला कुणाल पाटील यांनी दुजोरा दिला नाही.
धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातून इच्छुक
भाजपच्या वतीने धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे आणि राम मनोहर भदाणे या पिता पुत्रासह जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अरविंद जाधव आणि रामकृष्ण ऊर्फ बापू खलाणे तर शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख हिलाल माळी
काँग्रेसच्या वतीने विद्यमान आमदार कुणाल पाटील तर राष्ट्रवादीकडून किरण गुलाबराव पाटील, किरण शिंदे यांची नाव चर्चेत आहेत .
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपला मिळालेली मतं पाहता भाजपचा उत्साह वाढला आहे, त्यादृष्टीने भाजपने या मतदारसंघात आतापासूनच प्रयत्न सुरु केलेत. तर दुसरीकडे आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या मतदार संघात जवाहर ट्रस्टच्या माध्यमातून केलेल्या जनसंवर्धनाच्या केलेल्या कामांमुळे काही गावांना याचा फुल ना फुलाची पाकळी या उक्तीने लाभ होणार असल्यानं हे कुणाल पाटील यांच्यासाठी निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा होऊ शकतो. अर्थात याला मतदार कसा प्रतिसाद देतात हे मतपेटीतून स्पष्ट होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सिंधुदुर्ग
निवडणूक
निवडणूक
Advertisement