भगव्या रंगाच्या निमंत्रणपत्रिकेवर भाजप कार्यकर्त्यांना हवीहवीशी वाटणारी मोहोर उमटलीच, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारच!
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या निमित्तानं महायुतीची निमंत्रणपत्रिका समोर आली आहे.
मुंबई : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेणार आहेत. आज त्यांची भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची महायुतीच्या नेत्यांनी भेट घेतली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी देखील मंजुरी दिली असून उद्या महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा उद्या मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका भाजपच्यावतीनं छापण्यात आली आहे.
महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष आहेत. या पक्षांच्या चिन्हांचा समावेश भाजपनं प्रकाशित केलेल्या निमंत्रणपत्रिकेवर छापण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. तिन्ही पक्षाचा उल्लेख असलेली निमंत्रण पत्रिका भगव्या रंगात आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यासह इतर मंत्री पण उद्या शपथ घेण्याची शक्यता आहे. कारण, निमंत्रण पत्रिकेवर ‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा’ असा मजकूर या निमंत्रणपत्रिकेवर पाहायला मिळतो. उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी ६१ मान्यवर इतर राज्यातून येणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील. ते तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार देखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. एकनाथ शिंदे देखील मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी सूत्रांची माहिती आहे.
आझाद मैदानावर शपथविधीची जय्यत तयारी
मुंबईच्या आझाद मैदानात महायुतीच्या शपथविधीसाठी मुंबई पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.शपथविधी सोहळ्या दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून अडीच हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शपथविधी दरम्यान 10 पोलीस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलीस आयुक्त, 100 पोलीस निरीक्षक, 150 सहायक आणि पोलीस उपनिरीक्षकांसह 1500 हून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत.याच बरोबर सशस्र पोलीस दल, टास्क फोर्ससह इतर सुरक्षा यंत्रणाही सज्ज असणार आहेत. या शिवाय आझाद मैदान परिसर हा नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आला असून आजू बाजूच्या उंच इमारतींवरही पोलीस तैनात असणार आहेत.शिवाय ड्रोन द्वारेही पोलिसांची करडी नजर असणार आहे.
इतर बातम्या :