Maharashtra CM: महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी मोठ्ठा ट्विस्ट, उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाही तर...
Devendra Fadnavis Maharashtra CM: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रम आहे.
Devendra Fadnavis Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Maharashtra CM) यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला काही तास उरले असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde Deputy CM) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रम आहे. शिवसेना, राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकांवर एकनाथ शिंदेंचं नाव नाही. दोन्ही निमंत्रण पत्रिकांवर एकनाथ शिंदेंचं नाव नसल्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेच्या निमंत्रण पत्रिकेवर केवळ देवेंद्र फडणवीसांचं नाव आहे, तर राष्ट्रवादीच्या निमंत्रण पुत्रिकेवर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं नाव आहे. याचदरम्यान शिवसेनेचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रिपदावर भाष्य केलं.
उदय सामंत नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पाहिजे ही आमची भूमिका कालही होती आणि आजही आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की, आमच्या 59 आमदारांपैकी कोणीही उपमुख्यमंत्री होण्यासाठी इच्छूक नाही. आमच नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत. एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री होतील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही आणि त्यांनी आमच्यावर एखादी जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न केला तर ती आम्हीदेखील स्वीकारणार नाही, हे आम्ही शिंदे साहेबांना स्पष्टपणे सांगितले आहे, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत मी पण होतो.. आम्ही छापलेली निमंत्रण पत्रिका शासनाचा फॉरमॅट आहे. उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय तासाभरात होईल. एकनाथ शिंदे हे सन्मानपुर्वक आमच्या मागण्यांचा विचार करतील, असा विश्वास देखील उदय सामंत यांनी व्यक्त केला.
आम्ही नेता एकनाथ शिंदे यांनाच मानतो- उदय सामंत
या सरकारमध्ये आमचे नेते म्हणून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील आणि महाराष्ट्राच्या जनतेने आणलेल्या योजनांची कायमस्वरुपी करण्यासाठी ते देवेंद्र फडणवीसांना सहकार्य करतील, एकत्र बसून महाराष्ट्रातील निर्णय होतील, ही आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्रीपदासाठी कोणाचंही नाव येऊ नये, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आमच्या कोणाच्याही मनात असा उद्देश नाही की, या खुर्चीवर जाऊन बसावं. हा खुलासा करावं लागणं हे आमचे दुर्दैव आहे. आम्ही नेता एकनाथ शिंदे यांनाच मानतो. आमचं सगळ्यांचं राजकीय करिअर आम्ही त्यांच्या हातात दिलं आहे. त्यामुळे त्यांना डावलून कोणी काहीतरी करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, ही आमची इच्छा आहे, असं उदय सामंत म्हणाले.