Devendra Fadnavis: मित्रांसाठी देवाभाऊंचं मॉडेलिंग फोटोसेशन; देवेंद्र फडणवीसांचे फोटो पाहून अटलबिहारी वाजपेयींनी केला फोन
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी मित्रांच्या आग्रहाखातर मॉडेल म्हणून विशेष फोटो शूट ही करून घेतले होते.
Devendra Fadnavis Maharashtra CM: राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) किंवा लाखो लाडक्या बहिणींचे लाडके "देवाभाऊ" यांचे हजारो फोटो तुम्ही आजवर पाहिले असाल. मात्र, कधीकाळी याच देवाभाऊंनी मित्रांच्या आग्रहाखातर मॉडेल म्हणून विशेष फोटो शूट ही करून घेतले होते, असं नागपूरमधील छायाचित्रकार विवेक रानडे यांनी सांगितले.
राजकीय प्रचाराच्या होर्डिंग वर हसरा आणि आत्मविश्वासाने भरलेला चेहरा असलेल्या "देवाभाऊं"चे अनेक फोटो तुम्ही पाहिले असाल. टीव्हीवर आणि प्रत्यक्षात ही तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना अनेक वेळेला पाहिले असेल. मात्र, याच देवाभाऊंनी कधीकाळी मॉडेलिंग ही केली होती हे सांगितल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी एका खास प्रसंगात मॉडेलिंग सुद्धा केली होती. ती ही आपल्या खास मित्रांच्या आग्रहाखातर.
अटलबिहारी वाजपेयी यांचाही फोन-
2004 च्या सुमारास देवेंद्र फडणवीस ह्यांना त्यांच्या नागपुरातील मित्रांनी मॉडेलिंग करण्याचे आग्रह केले. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यासाठी तयार झाले नाही मात्र, नंतर मित्रांच्या हट्टापायी त्यांनी होकार दिले आणि नागपूरचे फैशन फोटोग्राफर विवेक रानडे यांच्या स्टुडियोमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे मॉडेल म्हणून फोटो शूट झाले. ब्लेझर, शर्ट, टी शर्ट, कुर्ता पायजामा अशा विविध ड्रेसेस मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे फोटो शूट पार पडले होते सुरुवातीला मॉडेल म्हणून कॅमेरा समोर फडणवीस काहीशे काहीशे संकोचले होते. मात्र, हळूहळू त्यांचे सर्व संकोच त्यागत फडणवीसांनी एकापेक्षा एक सरस पोझ दिले होते. एका राजकीय नेत्याचा मॉडेल म्हणून झालेला तो पहिला प्रयोग कमालीचा यशस्वी झाला होता. त्याकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या काही विशिष्ट पोशाखातील होर्डिंग्स नागपुरात विविध ठिकाणी लागले होते. त्याला नागपूरकरांनी तर जोरदार पसंती दिली होती. विशेष म्हणजे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही देवेंद्र फडणवीसांचे फोटो पाहून त्यांना फोन केले होते, अशी आठवण विवेक रानडे यांनी सांगितली.
देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार-
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर तब्बल 12 दिवसांनी आज महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा होत आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता महायुती 2.0 सरकारचा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेतील. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारही आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सोहळ्यासाठी तीन मोठमोठे स्टेज उभारण्यात आले आहेत. महत्वाचं म्हणजे भगव्या रंगाचा वापर इथे मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर बडे नेते उपस्थित राहणार आहेत.