एक्स्प्लोर
आम्ही मंत्रालयात पोहोचलो पण 'टिळक भवन'ला विसरलो, काँग्रेस विस्ताराकडे दुर्लक्ष झाल्याची थोरातांची कबुली
केंद्रात दोन टर्म आणि राज्यात तीन टर्म सत्ता मिळालेल्या काँग्रेसचं २०१४नंतर सुरू झालेलं अध:पतन काही थांबायचं नाव घेत नाहीये. देशभरात एकेक राज्य 'काँग्रेस मुक्त' होत असतानाच, महाराष्ट्रात तर काँग्रेस पक्ष 'नेते मुक्त' होऊ लागलाय. याचं मुख्य कारण ठरलं ते पक्षानं वर्षानुवर्ष पोसलेली विशिष्ट नेत्यांची मिरासदारी आणि नेत्यांची दुसरी फळी न घडवणं. 'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षे'त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही याचीच कबुली दिली.

मुंबई: आम्ही सत्तेत आलो, मंत्रालयात गेलो मात्र 'टिळक भवन'ला विसरलो, या शब्दात काँग्रेसचे नव्यानंच पदभार स्वीकारलेले प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षवाढीसाठी सर्वच नेते कमी पडल्याची कबुली दिली. मात्र, त्याचवेळी राहुल गांधींनंतर पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या रूपानं 'गांधी'च पक्षाध्यक्ष होण्याचं समर्थनही त्यांनी केलं. 'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षे'त ते बोलत होते. 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर आणि अन्य सहकाऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारले. मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा, विखे-पाटलांशी पक्षात असताना आणि नंतर राहिलेला संघर्ष, ईडीच्या चौकशीचा ससेमिरा, उर्मिला मातोंडकरचा पक्षत्याग, भाजपची लाट, नेत्यांचं आऊटगोईंग अशा अनेक विषयांवर थोरात यांनी मनमोकळी उत्तरं दिली. पाच वर्षांपूर्वी कुणाला ईडी माहितीही नव्हतं मात्र, आता सगळीकडे याची चर्चा आहे. सत्ताधाऱ्यांकडून त्याचा शस्त्रासारखा वापर होतोय, असंही थोरात म्हणाले. काँग्रेसमध्ये मुळीच मरगळ नसून, उलट जुने नेते गेल्यानं आता नवीन रक्ताला वाव मिळेल असं म्हणतानाच, यापूर्वीही काँग्रेस संपली असं म्हटलं जात असताना इंदिरा गांधी मोठ्या बहुमतासह निवडून आल्या, याची आठवणही त्यांनी करून दिली. विखेंवरील प्रश्नाला उत्तर देताना, आपल्याला शेजारी निवडता येत नाहीतस, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली. वंचित बहुजन आघाडी, मनसे यातील मनसेशी युती करण्याचा कोणताही मनसुबा नव्हता हे स्पष्ट करतानाच, वंचितचे आंबेडकर अशक्य मागण्या करत असल्यानं त्यांच्याशी आघाडी होऊ शकली नाही, हे थोरातांनी स्पष्ट केलं. या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेणं आवडेल का? या प्रश्नावर थोरातांनी कोणताही आडपडदा न ठेवता राजकारणी असल्यानं महत्वाकांक्षा असतेच, त्यामुळे अशी जबाबदारी आपण स्वीकारू हे मान्य केलं.
आणखी वाचा




















