(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी गायब? नागपुरातील रामगिरी निवासस्थानावरील प्रकार
नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोरून एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी काढण्यात आली आहे. राज्यात मुख्यमंत्री बदलणार आहेत, त्यामुळे नावाची पाटी काढली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Maharashtra New CM नागपूर : नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानासमोरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्या नावाची पाटी काढण्यात आली आहे. राज्यात मुख्यमंत्री बदलणार आहेत, त्यामुळे नावाची पाटी काढली आहे का? असा प्रश्न या निमित्याने निर्माण झाला आहे. मात्र रामगिरी बंगल्याचा मेंटेनन्सचे काम सांभाळणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे असे म्हणणं आहे की, हिवाळी अधिवेशनाचे अनुषंगाने सध्या विविध ठिकाणी मेंटेनन्सचे आणि रंगरंगोटीचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी काढण्यात आली असावी. याचा राज्यातील सत्ता बदलाशी संबंध नाही असेही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी (ऑफ द रेकॉर्ड) सांगत आहेत.
नागपुरातील रामगिरी निवासस्थानावरील प्रकार
विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यात नियोजित असलेल्या हिवाळी अधिवेशनाची तयारीही नागपुरात विविध ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्याच्या आत आणि बंगल्याच्या बाहेर दरवर्षी केली जाणारी हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्रिपद भाजपला जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर आलं आहे. याचदरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ( Narendra Modi ) भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. शिवसेनेचे माजी खासदारही दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे यांचे 7 खासदार आणि 4 माजी खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नरेंद्र मोदी आणि शिवसेनेच्या खासदारांच्या या भेटीमध्ये नेमकं काय घडतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानासमोरून एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी काढण्यात आली असल्याने अनेक तर्क वितर्कही लावले जात आहे.
मुख्यमंत्रीपद काढून घेतल्यास शिंदे गटाला केंद्रात महत्त्वाचे खाते?
एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेतल्यास भाजपकडून त्याची भरपाई केली जाऊ शकते. त्यानुसार शिंदे यांच्या पक्षाला केंद्रात महत्त्वाचे खाते मिळू शकते. तर श्रीकांत शिंदे यांचा राज्यातील मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेताना भाजपचे नेते त्यांची कशाप्रकारे मनधरणी करणार, हे पाहावे लागेल. शिंदे यांची समजूत काढण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. त्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी शनिवारी किंवा रविवारी होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा