लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 150 जागा मिळतील, सुशीलकुमार शिंदेंचा अंदाज
सुजय विखेंचा भाजप प्रवेश, त्यावरुन राधाकृष्ण विखेंच्या राजीनाम्याची झालेली मागणी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, नोटबंदी, जीएसटी, चौकीदार आदी मुद्द्यांवर सुशीलकुमार शिंदेंनी आपली कणखर मतं मांडली.
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सोलापूर मतदार संघातील उमेदवार माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर मनमोकळेपणाने मतं मांडली. सुजय विखेंचा भाजप प्रवेश, त्यावरुन राधाकृष्ण विखेंच्या राजीनाम्याची झालेली मागणी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, नोटबंदी, जीएसटी, चौकीदार आदी मुद्द्यांवर सुशीलकुमार शिंदेंनी आपली कणखर मतं मांडली.
सुजय विखेंनी भाजपप्रवेशाबाबत बोलताना म्हटलं की, प्रत्येकाला करिअर करायचं असतं. तिकीटवरुन नाराजी म्हणून तरुण पक्ष बदलत आहेत. वैचारिक भूमिका आहे पण मुलांना स्वतःचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसचे प्रामाणिक नेते आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असंही सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
आगामी निवडणुकीत धर्मनिरपेक्ष देश, नोकरी, जीएसटी, शेतकऱ्यांचे प्रश्न इत्यादी काँग्रेसचे मुद्दे असतील. नोटबंदीनंतर दहशतवाद मिटेल असे दावे केले होते. मात्र असं काहीही झालेलं नाही. नोटबंदीनंतर ही भारतावरील दहशतवादी हल्ले कमी झालेली नाहीत. काश्मीरचा मुद्दा भाजपला सांभाळता आलेला नाही, असा आरोपही सुशील कुमार शिंदेनी केला आहे.
भाजपला 150 जागा मिळतील
ज्या राज्यांमध्ये आमचं सरकार आलं, त्याठिकाणी आम्ही जे सांगितलं ते करुन दाखवलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आश्वासन दिलं होतं, ते सत्तेत आल्यानंतर तातडीनं पूर्ण केलं. भाजपची सध्याची स्थिती पाहता लोकसभा निवडणुकीत त्यांनी 150 जागांवर समाधान मानावं लागेल, असा अंदाज सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केला आहे.
वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असेल
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा केली होती. मात्र ते महाआघाडीत सामील झाले नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीने वंचित बहुजन आघाडीला 4 जागा दिल्या होत्या, तरीही ते सोबत आले नाहीत. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असेल.
प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्याबद्दल बोलताना, मी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर समोर कोण आहे हे पाहत नाही, असा विश्वास सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केला.