(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajasthan Election Result : राजस्थानमध्ये 'भाजप लाट'; गहलोत मंत्रिमंडळातील 12 मंत्र्यांचा पराभव
Rajasthan Election Result 2023 : आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार बीजेबी 117 जागांवर निवडणूक जिंकत आहे, तर काँग्रेसला फक्त 68 जागा मिळाल्या आहेत.
Rajasthan Election Result 2023 : राजस्थानमधील 199 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहे. या निकालाचे कल पाहता भाजप राजस्थानमध्ये जोरदारपणे पुन्हा एकदा सत्तेत परतताना दिसत आहे. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणाऱ्या गहलोत मंत्रिमंडळातील 12 बलाढ्य नेत्यांचा पराभव झाला आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार बीजेबी 117 जागांवर निवडणूक जिंकत आहे, तर काँग्रेसला फक्त 68 जागा मिळाल्या आहेत.
काँग्रेसच्या 'या' 12 मंत्र्यांचा पराभव
- गहलोत सरकारमधील बडे मंत्री भाजपच्या उमेदवारांच्या हातून निवडणुकीत पराभूत झाले आहेत. राजस्थान सरकारचे मंत्री गोविंद राम मेघवाल यांचा खाजुवाला मतदारसंघातून पराभव झाला आहे. त्यांचा भाजपच्या विश्वनाथ मेघवाल यांनी पराभव केला आहे.
- मंत्री भंवरसिंह भाटी यांनाही कोलायतमधून पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचा भाजपच्या अंशुमन सिंह भाटी यांनी पराभव केला आहे.
- याशिवाय मंत्री रमेश मीणा यांचा सपोत्रा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार हंसराज मीणा यांच्याकडून पराभव झाला.
- तर, लालसोटमधून मंत्री प्रसादीलाल मीणा यांचा भाजपच्या भजनलाल मीणा यांनी पराभव केला.
- डीग-कुम्हेरमधून मंत्री विश्वेंद्र सिंह यांचा भाजपचे डॉ. शैलेश सिंह यांनी पराभव केला आहे.
- सिव्हिल लाईन्समधून भाजपचे गोपाल शर्मा यांनी प्रताप सिंह खचरियावास यांचा पराभव केला आहे.
- मंत्री ममता भूपेश यांचा सिकराईमधून भाजपच्या विक्रम बनशीवाल यांनी पराभव केला आहे.
- बनसूर मतदारसंघातून मंत्री शकुंतला रावत, कोतपुतलीमधून मंत्री राजेंद्र यादव, बिकानेर पश्चिम मतदारसंघातून मंत्री बीडी कल्ला आणि अंता विधानसभा मतदारसंघातून मंत्री प्रमोद जैन भाया यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
काँग्रेस कार्यालयात शांतता
भाजपच्या हातून झालेल्या पराभवानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत संध्याकाळी राजभवनात जाणार असून, तिथे ते राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील. राजस्थानच्या या निवडणूक निकालानंतर जयपूरच्या काँग्रेस कार्यालयात शांतता पाहायला मिळत आहे. दुसरीकडे भाजप कार्यालयात जल्लोषाचे वातावरण आहे. भाजपचे कार्यकर्ते मिठाई वाटून फटाके फोडून विजय साजरा करत आहेत.
वसुंधरा राजे जयपूर येथील भाजप कार्यालयात पोहोचल्या
राजस्थानमध्ये भाजप विजयाच्या दिशेने जात असतानाच माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे जयपूरमधील भाजप कार्यालयात पोहोचल्या आहेत. वसुंधरा राजे यांनी झालरापाटन विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रामलाल चोहान यांचा 53193 मतांनी पराभव केला आहे. तर, वसुंधरा राजे या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत देखील असल्याचे बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: