(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मी संधीसाधू तर शरद पवार कोण?; अशोक चव्हाणांचा प्रतिसवाल, जरांगेंच्या भूमिकेवरही परखड मत
संधीसाधू तर शरद पवार कोण, याचंही उत्तर त्यांना द्यावं लागेल, असे चव्हाण यांनी म्हटलं.
नांदेड : भाजप खासदार आणि नांदेडचे नेते अशोक चव्हाण हेही जिल्ह्यातील राजकारणात निवडणुकांच्या अनुषंगाने सक्रीय झाले आहेत. भाजपा महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. दुसरीकडे लोकसभा पोटनिवडणुतही भाजप महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे लक्ष्य त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे, विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी अशोक चव्हाण मोट बांधत आहेत. त्याच अनुषंगाने पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया दिली. तसेच, शरद पवारांनी केलेल्या टीकेवरही पलटवार केला आहे. अशोक चव्हाण हे संधीसाधू असल्याची बोचरी टीका शरद पवारांनी केली होती. आता, शरद पवारांच्या टीकेला अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलंय. मी संधीसाधू तर शरद पवार कोण, याचंही उत्तर त्यांना द्यावं लागेल, असे चव्हाण यांनी म्हटलं.
चव्हाण कुटुंबीयांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपद, देशाचे गृहमंत्रीपद, अर्थमंत्रीपद, संरक्षणमंत्रीपद दिले. स्वत: अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद दिले, अजून काय द्यायचे असा सवाल करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. तसेच, काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात गेल्याने, अशोक चव्हाण हे संधीसाधू असल्याची बोचरी टीकाही शरद पवारांनी केली होती. आता, शरद पवारांच्या टीकेला अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मी संधीसाधू तर शरद पवार कोण?
शरद पवार नेमकं काय म्हणाले हे मला माहित नाही, पण शरद पवार खूप ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी माझ्यासारख्या लहान माणसावर वक्तव्य केलं असेल असं मला वाटत नाही, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले. त्यानंतर, मी जर संधी साधू आहे, तर मग पवार साहेब काय आहेत? या प्रश्नाचे उत्तर सुद्धा शरद पवार यांना द्यावं लागेल, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी शरद पवारांवर पलटवार केला आहे.
मनोज जरांगेंच्या भूमिकेवरही प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांनी ज्याला पाडायचंय त्याला पाडा अशी भूमिका घेतलीय. त्यासंदर्भाने बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, हे लागू कोणाला होते, ज्यांनी अन्याय केला असेल त्यांना लागू होतं असेल. ज्यांनी समाजासाठी काम केले, त्यांना मदत करा ही भूमिका आहे आणि जरांगे यांच्या भूमिकेबद्दल मी सकारात्मक पद्धतीने बघतो, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. मी सामाजिक आरक्षणासाठी भूमिका घेतली, सभागृहात विषय मांडले, त्याचा पाठपुरावा केला या सर्व गोष्टी ज्यांनी केल्या त्यांना मदत केलीच पाहिजे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीवर टीका
नांदेड उत्तर मतदार संघातून ठाकरे गटाचे संगीता पाटील डक तसेच काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांना उमेदवारी जाहीर झाल्या आहेत. शरद पवार यांनी अब्दुल सत्तार यांना पाठिंबा दिलाय तर उद्धव ठाकरे यांनी संगीता पाटील डक यांना पाठिंबा दिलाय. त्यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ राहिलेला नाही, त्यामुळे यांचा नुसता गोंधळ चाललाय आणि असाच गोंधळ राज्यपातळीवर झाला तर, आपण राज्याचा काय विचार करणार.
हेही वाचा
Election 2024: व्हॅनमध्ये तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा, पोलिसांच्याही भुवया उंचावल्या; पाहा फोटो