शिवसेना-भाजप युतीची घोषणा; मात्र जागावाटप अजूनही गुलदस्त्यात, कारण...
शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीची घोषणा अखेर पत्राद्वारे करण्यात आली आहे. मात्र ज्या गोष्टीची अवघ्या राजकीय विश्वात उत्सुकता आहे, त्या जागावाटपाचा फॉर्म्युला मात्र अद्याप जाहीर झालेला नाही.
मुंबई : शिवसेना-भाजपचं अखरे ठरलं आणि सोमवारी रात्री संयुक्त पत्रक काढून युतीची घोषणा करण्यात आली. मात्र युतीची घोषणा झाली असली तरी जागावाटपाचा फॉर्म्युला अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला उघड न करण्याची दोन मुख्य कारणं सांगितली जात आहेत.
एकतर काही जागांवरून दोन्ही पक्षात बंडखोरी उफाळून येऊ शकते आणि दुसरं कारण म्हणजे सन्मानजनक तोडगा नसल्याने शिवसेनेची अडचण होऊ शकते, या कारणांमुळे युतीचा फॉर्म्युला अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही.
या जागांवर होऊ शकते बंडखोरी
कल्याण पश्चिम : भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांना शिवसेनेच्या आग्रहामुळे जागा सोडावी लागत असल्याने भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मंत्री विनोद तावडे या जागेसाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील होते.
ठाणे शहर : 2014 ला भाजपचे संजय केळकर या जागेवरुन निवडून आले असले तरी युतीत ही जागा शिवसेनेची होती. आता शिवसैनिक या जागेसाठी आग्रही असून भाजपला मदत करणार नसल्याच्या पवित्र्यात आहेत.
वडाळा : विद्यमान काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे जागा भाजपला सुटली. मात्र युतीत ही जागा शिवसेनेकडे असल्याने शिवसैनिक या जागेसाठी आग्रही होते. आता शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी येथून बंडाचा झेंडा फडकवला आहे.
चंदगड : कोल्हापूरच्या 8 पैकी 6 जागा शिवसेना तर दोन भाजपच्या कोट्यातील होत्या. मात्र सेनेनं सर्व एबी फॉर्म वाटून भाजपची विशेषतः चंद्रकांत पाटलांची कोंडी केली. त्यामुळे चंदगडमधून भाजपच्या इच्छुक उमेदवारांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मूक संमती देण्यात आल्याचं कळतंय.
किनवट : या जागेवर भाजपचे प्रबळ दावेदार असूनही ही जागा रिपाइंला सोडण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपच काय तर शिवसेनेचे कार्यकर्तेही नाराज आहेत. इथूनही बंडखोरी होऊ शकते.
औसा : शिवसेनेकडे असलेल्या या जागेवरून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार इच्छुक आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही जागा प्रतिष्ठेची केल्याचं बोललं जातंय. यामुळे स्थानिक शिवसैनिकांवर भाजपचा उमेदवार लादल्याची भावना आहे.
WEB EXPLAINER | निवडणुकीतील हे ‘AB फॉर्म’ प्रकरण आहे तरी काय? | बातमीच्या पलिकडे
ऐरोली आणि बेलापूर : राष्ट्रवादीतून भाजपात आयात केलेल्या नाईक कुटुंबियांमुळे ऐरोली आणि बेलापूर या दोन जागांचा पेच निर्माण झाला आहे. गणेश नाईकांना आव्हान देऊन पराभूत करणाऱ्या मंदा म्हात्रे यांना यंदा बेलापूर या जागेवर पाणी सोडायला लागू शकतं. तसेच दोन्ही जागा भाजपला सुटत असल्याने शिवसैनिकांमध्ये रोष आहे.
मुंबादेवी : या जागेवर शिवसेनेनं काल विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांना एबी फॉर्म देऊन दावा पक्का केला. मात्र महिन्याभरापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी मुंबादेवीत भाजप नगरसेवक अतुल शाह यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करुन या जागेवरून उमेदवारीचे संकेत दिले होते. मात्र आता अतुल शाह यांना माघार घ्यावी लागेल अशी चिन्ह आहेत.
तसेच देवळी, मान खटाव, पिंपरी, सावनेर या जागांवरुन पेच कायम असल्याने जागावाटप जाहीर केल्यास कार्यकर्त्यांची नाराजी वाढू शकते. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढू शकते. अशा परिस्थितीत उमेदवारी यादी जाहीर न करताच शिवसेना-भाजपने एबी फॉर्म वाटप करण्यास पक्षाने सुरुवात केली.
संबंधित बातम्या