बीडमध्ये लक्ष घालण्यापेक्षा बारामतीत लक्ष द्यावं, एखादी जागा वाढेल; पंकजा मुंडेंचा शरद पवारांना टोला
शरद पवारांनी बीड जिल्ह्याला राजकारणाशिवाय काहीच दिले नाही. बीड जिल्ह्याला शाश्वत विकास आम्ही दिला, तुम्ही काय दिले? असा सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला आहे.
बीड : शरद पवारांनी बीडमध्ये लक्ष घालण्यापेक्षा बारामतीत लक्ष द्यावं, त्यामुळे एखादी जागा तरी वाढेल. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या हाती काही लागेल हे शक्य नाही, अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे बीड जिल्हा आता स्वत:चे नेतृत्व सांभाळण्यासाठी सक्षम आहे, असा टोलाही पंकजा मुंडेंनी लगावला. परळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
शरद पवारांनी बीड जिल्ह्याला राजकारणाशिवाय काहीच दिले नाही. विकासाची कवडी पण दिली नाही. बीड जिल्ह्याला शाश्वत विकास आम्ही दिला, तुम्ही काय दिले? एकादा बंधारा तरी दिला का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला.
बीड जिल्ह्यातील लोकांच्या विकासाची जबाबदारी आम्ही पूर्ण करु. जर पवारांचे बीडवर खुप प्रेम होतं तर किमान एखादा प्रकल्प द्यायला हवा होता किंवा रस्ता तरी दिला का? केंद्रीय कृषीमंत्री असताना एक बंधारा तरी दिला का? मग का बीडच्या लोकांना मतदानासाठी हाक देत आहात, असा प्रश्न पंकजा मुंडेंनी पवारांना विचारला.
गेल्या पाच वर्षात बीड जिल्ह्यात आम्ही विकासाची पायाभरणी केली. पुढील पाच वर्षात शाश्वत विकास करु, यासाठी मोदीजी येत आहेत, ही भाग्याची गोष्ट आहे, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं.
पवारांच्या सभांची आम्हाला सवय झाली आहे. शरद पवारांना वारंवार बीड जिल्ह्यात यावं लागतं हे धनंजय मुंडेसाठी चांगलं लक्षण नाही. तरुणांनी वयोवृद्धांना फिरवणे ही चांगली गोष्ट नाही. एवढी वर्ष सत्ता असताना बीड जिल्ह्याला फुटकी कवडी दिली नाही. आता राष्ट्रवादीने विश्वास गमावला आहे, त्यामुळे भविष्य आमचं आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
VIDEO | ...तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही : पंकजा मुंडे | बीड | ABP Majha