Andheri East Bypoll Election : ऋतुजा लटके यांना हायकोर्टाचा दिलासा, कोर्टात कोणाचा काय युक्तिवाद?
Andheri East Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.
Andheri East Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) मोठा दिलासा दिला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. या परिस्थितीत आम्हाला हस्तक्षेप करणं भाग आहे. उद्या सकाळी 11 पर्यंत राजीनामा स्वीकारल्याचं पत्र द्या, असं हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. मुंबई महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर न केल्याने त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी झाली. कोर्टात नेमकं काय काय घडलं, कोणी काय युक्तिवाद केला हे जाणून घेऊया.
दुपारी एकच्या सुमारास ऋतुजा लटके यांच्या याचिकेवर सुनावणी सुरु
ऋतुजा लटके यांच्यावतीने विश्वजीत सावंत युक्तिवाद करत होते
मुंबई महापालिकेसाठी ज्येष्ठ वकील अनिल साखरे बाजू मांडत होते
2 सप्टेंबरचा राजीनामा वाचून त्यावर ऋतुजा लटके यांच्या वतीने युक्तिवाद सुरु आहे
ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा युक्तिवाद
ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचे वकील : हा अर्ज 29 सप्टेंबरला नाकरण्यात आला. 3 ऑक्टोबरला पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच रितसर राजीनामाच (Rutuja Latke Resignation) पालिकेकडे सादर केला. त्यानंतर 1 महिन्याचा कालावधी टाळण्याची विनंती करताच ठराविक रक्कम भरण्याची सूचना मला करण्यात आली. त्यानुसार मी 67 हजार पालिकेच्या तिजोरीत जमा केले. त्याची रिसिटही मला देण्यात आली आहे. मात्र तुमचा राजानाम्याचा अर्ज पालिका आयुक्तांकडे प्रलंबित असल्याचं सांगत तो मंजूर झालेला नाही. मुळात या पदावरील कर्मचाऱ्याचा राजीनामा आयुक्तांपर्यंत जातच नाही. तो सह आयुक्त स्तरावरच पास केला जातो. मात्र मी निवडणूक लढवत असल्यानं राजकीय दबावापोटीच तो थांबवण्यात आलाय
ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचे वकील : जर मी नोटीस कालावधीच्या बदल्यातील रक्कम भरली नसती तर त्याच्या वसुलीसाठी तो थांबवता आला असता. मात्र मी त्या रकमेसह पालिकेचं कुठलंही इतर देणं ठेवलेलं नाही. त्यामुळे माझा राजीनामा थांबवण्याचं काहीही कारण उरत नाही. महापालिकेने माझा राजीनामा स्वीकारुनही तो मंजूर केलेला नाही.
मुंबई महापालिका : एखादा कर्मचारी राजीनामा देऊन निवडणूक लढवू इच्छित असेल तर काय प्रक्रिया आहे? लटके यांनी सादर केलेला राजीनामा योग्य स्वरुपात नाही. त्यावर रितसर निर्णय देण्यास वेळ लागणं स्वाभाविक आहे. केवळ एका महिन्याचा पगार जमा केला, म्हणून राजीनामा तातडीने स्वीकारावा अशी मागणी करणं चुकीचं.
हायकोर्ट : या प्रकरणात महापालिका भेदभाव करतंय असं वाटत नाही का? तुमच्या क्लास 3 चा कर्मचारी निवडणूक लढवू इच्छितो तर त्यात हरकत काय आहे?
दुपारी 2:30 वाजेपर्यंत मुंबई पालिकेला ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर उत्तर देण्याचे निर्देश
दुपारी 2. 40 वाजता लटकेंच्या याचिकेवर सुनावणीला पुन्हा सुरुवात
मुंबई महापालिका : ऋतुजा लटकेंविरोधात एक तक्रार अद्याप प्रलंबित
हायकोर्ट : काय तक्रार आहे?
मुंबई महापालिका : एका तक्रारदाराने लटकेंच्या विभागीय चौकशीची मागणी केली होती. लटकेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. लायसनिंगच्या एका प्रकरणात लटकेंनी लाच मागितल्याचा आरोप आहे. याची जर चौकशी सुरु असेल तर राजनीमा मंजूर होऊ शकत नाही
ऋतुजा लटकेंचे वकील : चौकशी होत राहिल, निवडणुकीकरता राजीनामा स्वीकारावा
मुंबई महापालिका : तुम्ही उमेदवारी अर्ज भरा, आमची काहीच हरकत नाही,तो तुमचा निर्णय आहे.
ऋतुजा लटकेंचे वकील : मात्र जोपर्यंत राजीनामा स्वीकारत नाही तोपर्यंत अर्ज वैध ठरणार नाही
मुंबई महापालिका : प्रशासन कुणाचाही राजीनामा तातडीनं स्वीकारत नाही. एक महिन्याचा नोटीस कालावधी अनिवार्य आहे. राजीनाम्यावर महिन्याभरात निर्णय घेणं आयुक्तांना अनिवार्य आहे. तोपर्यंत तो कर्मचारी त्याच्या सेवेत कायम असतो
मुंबई महापालिका : महिन्याभराचा नोटीस कालावधी शिथिल करायचा की नाही?, हा सर्वस्वी पालिकेचा अधिकार आहे. प्रत्येक प्रकरणात तो वेगळा असू शकतो.
हायकोर्ट : पैसे भरले म्हणून महिन्याभराचा नोटीस कालावधी रद्द करा ही मागणी कर्मचारी हायकोर्टात येऊन करु शकत नाही
मुंबई महापालिका : यात निवडणूक आयोगाला प्रतिवादा करण्यात आलेलं नाही. यात केवळ पालिका प्रतिवादी आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला निर्देश देता येणार नाहीत. याचिकाकर्त्यांनी निवडणूक त्यांच्या निर्णयावर लढवावी
मुंबई महापालिका : याचिकाकर्त्यांनी निवडणुकीबाबत कोणतीही थेट मागणी केलेली नाही. त्यांची याचिका केवळ महापालिकेने राजीनामा स्वीकारण्याबाबत आहे.
मुंबई महापालिका : ऋतुजा लटकेंच्या याचिकेत तथ्य नाही, याचिका फेटाळून लावा अशी मागणी करतो.
ऋतुजा लटकेंच्या वकिलांचं मुंबई महापालिकेच्या युक्तिवादाला उत्तर
ऋतुजा लटके यांचे वकील : नियमानुसार आमची प्रक्रिया योग्य आहे. याबाबतीतले आधीचे निकालही स्पष्ट आहेत. केवळ राजकीय दबावापोटी हे सारं रचण्यात आलं आहे.
ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचे वकील : लटके यांच्याविरोधाती तक्रारीवर वकिलांकडून सवाल उपस्थित करण्यात आले. तक्रारदार अंधेरी पश्चिमेत राहणारा असून वकील पनवेलचा आहे. तक्रारीच्या पत्रावर तारीखही बदललेली दिसत आहे
हायकोर्ट : या परिस्थितीत आम्हाला हस्तक्षेप करणं भाग आहे. उद्या सकाळी 11 पर्यंत राजीनामा स्वीकारल्याचं पत्र द्या